
मुंबई शहर आणि उपनगराला जोडणाऱया शीव उड्डाणपूल तसेच विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होण्यासाठी मुंबईकरांना आता सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. यापूर्वी शीव आणि विद्याविहार या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी पालिकेने 15 ऑगस्टचा मुहूर्त दिला होता. मात्र काम अपूर्ण झाले नसल्याने हा मुहूर्त हुकणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन शीव उड्डाणपूल धोकादायक झाल्याने तो पाडून 2024पासून पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. शीव रेल्वे स्थानकावरील रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वेने पालिकेकडे सोपवले आहे. हा पूल रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमधून जात असल्याने त्याच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव रेल्वेने दिला होता. या कामासाठी पुनर्बांधणीचा खर्च मध्य रेल्वेमार्फत दिला जाणार आहे. मात्र पुलाच्या पोहोच रस्त्याचे काम मुंबई महानगरपालिकेने करावे, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोहोच रस्त्याचा खर्च पालिका प्रशासन करणार आहे. दरम्यान, शीव पूल 15 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानंतर 15 ऑगस्टचा मुहूर्त ठरला होता. मात्र मध्य रेल्वेकडून मेगा ब्लॉकची वेळ निश्चित ठरत नव्हती. मात्र 8 व 9 ऑगस्टच्या मध्यरात्री पूर्वेकडील गर्डर लाँच करण्यात आल्याने पुढील 45 दिवस पालिकेला उर्वरित कामे करण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे शीव उड्डाणपूल सप्टेंबर अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
- विद्याविहार रेल्वे स्थानक येथील उड्डाणपूल प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सद्यस्थितीत 2 स्पॅनचे काँक्रिट कास्टिंग वगळता विद्याविहार उड्डाणपुलाची बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत कामे ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच भार चाचणी व इतर आवश्यक चाचण्या झाल्यानंतर 8 सप्टेंबरनंतर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो.



























































