
>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
[email protected]
संवेदनशील वृत्ती, सखोल व्यासंग आणि कृती प्रवणतेनं आपली स्वतंत्र वाटचाल करणाऱ्या लेखिका प्रतिभा रानडे यांनी विलक्षण संवेदनशीलतेने स्त्रीचं जगणं समजून घेत आपल्या लेखणीतून मांडले आहे.
`ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’ या पुस्तकामुळे मराठी वाचकांशी जिव्हाळ नातं जोडलेल्या प्रतिभा रानडे यांचा जन्म 20 ऑगस्ट 1937 चा. त्यांचं लहानपण कोल्हापुरात गेलं. कोशकार गणेश रंगो भिडे हे त्यांचे वडील. घरातून आधुनिक विचारांचं, समाजाभिमुखतेचं, अभिरुची संपन्नतेचं आणि ज्ञाननिष्ठेचं बाळकडू प्रतिभाताईंना लाभलं. हे पाथेय घेऊन त्यांनी पुढे चिकित्सक तरी संवेदनशील वृत्तीनं, सखोल व्यासंग आणि कृती प्रवणतेनं आपली स्वतंत्र आणि दमदार वाटचाल केली. त्यांची पदवी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांत. आपल्या लेखनातून या दोन्ही विषयांचा आणि पत्रकारितेचाही हात त्यांनी घट्ट धरून ठेवल्याचं दिसतं. कुतूहल, अभ्यासू वृत्ती, स्वतंत्र विचार आणि धाडस या त्यांच्या लेखन स्वभावानं त्यांच्या बहुतांश लेखनाला आकार दिला आहे. विशेषत `अनुबंध : धर्म-संस्कृतींचे’, `आर्थिक सत्ता आणि राजसत्तांची धग’, `पाकिस्तान : अस्मितेच्या शोधात’सारख्या त्यांच्या वैचारिक ग्रंथांत ते जाणवतं.
विवाहानंतर पती मुकुंद रानडे यांच्या सरकारी नोकरीमुळे देशात कोलकाता, इम्फाळ, शिलॉंग, दिल्ली आणि परदेशात काबूल अशा विविध ठिकाणी वास्तव्य करण्याची संधी त्यांना मिळाली. तिचं त्यांनी अक्षरश सोनं केलं. `काबूल-कंदाहारकडील कथा’, `अफगाण डायरी’, `बुरख्याआडच्या स्त्रिया’, `फाळणी ते फाळणी’ ही त्यांच्या पुस्तकांची शीर्षके त्याची साक्ष देतात. `स्त्राr-प्रश्नांची चर्चा’सारखे अनेक अभ्यास-प्रकल्प, अमीर खुसरो, राणी लक्ष्मीबाई, फैज अहमद फैज, दुर्गाबाई भागवत अशी चरित्रे, `नल पाकदर्पण’सारखे अनोखे संपादन, `बंद दरवाजा’सारखे अनुवाद आणि `अबोलीची भाषा’, `स्मरणवेळा’ असे ललित गद्य नि `अखेरचा बादशहा’, `अंगण विश्वाचे अवकाश मनाचा’, `परकं रक्त’, मानुषी असे कथा-कादंबऱयारूपी कथनात्मक साहित्य असा चौफेर संचार त्यांच्या लेखणीनं केला.
डोळसपणे केलेला भरपूर प्रवास, खान अब्दुल गफार खान ते भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून ते अनेक मोठे कलावंत, लेखक, विचारवंत, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी ओळखी आणि गाठीभेटी असं अगदी समृद्ध जीवन त्या जगल्या. ऐंशीच्या दशकात गाजलेल्या शाहबानो खटल्याच्या वेळी निघालेल्या `तलाक मुक्ती मोर्चा’त सहभागी झालेल्या त्या एकटय़ा हिंदू महिला होत्या. `पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फोर पीस अँड डेपासी’ या संघटनेच्या कराचीला झालेल्या संमेलनाला त्या उपस्थित होत्या. त्यावेळी कराची, लाहोरसह मोहेंजदारो-हडप्पा या ठिकाणी त्यांना राहता आलं. महात्मा जोतिबा फुले यांच्यावरील ग्रंथासाठी संशोधन करायला लंडनला वास्तव्य करणे असो की जेरुसलेममधील कार्पामाला प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहणे असो, प्रतिभाताईंनी आलेल्या प्रत्येक अनोख्या संधीचा समर्पक उपयोग करून घेतला. जे धगधगीत वास्तव त्यांना या निमित्तानं अनुभवता आलं ते त्यांच्या पुस्तकातून प्रकटत राहिलं. स्वतला पडलेल्या अनेक प्रश्नांच्या शोधात हे लेखन झालेलं असल्यामुळे त्यात सम्यक दृष्टिकोन आढळतो. एकांगीपणापासून, आग्रही भूमिकेपासून त्यांचं लेखन दूर आहे.
त्यांच्या सर्वच लेखनात `स्त्री’ हा त्यांच्या निरीक्षणाचा, चिंतनाचा विषय झालेला दिसतो. मग ती स्त्री एकोणिसाव्या शतकातील असो, बुरख्यातली मुस्लीम स्त्री असो की आधुनिक स्त्राr असो…प्रतिभाताई विलक्षण संवेदनशीलतेने तिचं जगणं समजून घेतात आणि मांडतात. त्या म्हणतात, “ आजची बाई म्हणते की, आमचं बाईपण आमचे नवरे आम्हाला विसरू देत नाहीत, ही खरी शोकांतिका आहे. परिस्थिती फार नाही बदलली…विभावरी शिरूरकरांच्या नायिकेने `बाबांचा संसार माझा कसा होणार?’ असा प्रश्न विचारला. पुढच्या काळातील नायिकेला `माझा संसार तरी माझा आहे का?’ असा प्रश्न पडला आणि आताची नायिका `विवाह, संसार खरंच गरजेचा आहे का?’ असा प्रश्न विचारते आहे.”
आज नव्वदीमध्ये असलेल्या ताई अतिशय साधेपणाने राहतात. व्यक्तिमत्त्वातला हा साधेपणा त्यांच्या लेखणीतही उतरला आहे. तर्कनिष्ठ वैचारिक लेखन करतानाही भाषेची प्रासादिकता त्यांनी जपली आहे. जीवन भरभरून जगताना माणूस आणि त्याचं जगणं मोलाचं मानून सत्याचा स्वीकार आणि नकाराचं स्वातंत्र्य अबाधित ठेवत त्यांची वाटचाल चालू आहे. ती अशीच राहो!





























































