
>>अक्षय मोटेगावकर
आतल्या कोलाहलाला रोखताही येत नाही
अन् कधी बाहेर त्याला काढताही येत नाही
रोजचे धकाधकीचे आयुष्य जगणाऱ्या पण कर्तृत्ववान असणाऱ्या पुरुष किंवा स्त्री मंडळींची ही व्यथा एवढय़ा चपखलपणे एका शेरात पकडता येईल असे कधी वाटलेही नसेल तेव्हा ही गझल सामोरी येते आणि संपूर्ण गझलसंग्रहाचीच उत्सुकता वाढवते. गझलकार दिवाकर जोशी यांचा ‘सलतो उरात काटा’ हा गझलसंग्रह एकाच बैठकीत संपवायच्या अनुभूतीचा नाहीच. एकेक गझल मनात साठवावी, पुरवून पुरवून रिचवावी असा आहे. दिवाकर जोशी म्हणजे हाडाचे शिक्षक, पण भाळावरल्या रेषा खोडत विधात्याने लिहिलेला ललाट लेख आपण बदलू शकलो नाहीत आणि आपण या काळातले ‘गुरुजी’ होऊ शकलो नाही ही खंत त्यांना उरात सलते. एका गझलेत ते म्हणतात-
भाळावरल्या रेषा खोडत डस्टर झालो आहे
‘गुरुजी’ होणे जमले नाही, मास्तर झालो आहे
रोज फळ्यावर लिहितो पुसतो माझी स्वप्ने सारी
त्या स्वप्नांचे मळके अवजड दप्तर झालो आहे
वास्तवाचे चटके सोसत, वास्तवाचे संपूर्ण भान राखत परिस्थितीने शहाणा झालेला माणूसच असा शेर लिहू शकतो. कारण त्याने सर्व प्रकारचे अनुभव घेतलेले असतात. बऱ्या-वाईटाची जाण आलेली असते. आता त्याला चेहऱ्यांमागचे चेहरे ओळखणेदेखील जमलेले असते. एका गझलेत ते ही ओळख फार मार्मिक पद्धतीने पकडतात-
जे पेरतात तुमच्या अंधार भोवताली
देतील तेच नंतर हातामध्ये मशाली
आपली मेहनत ही अनाठायी जायला नको, त्याला सहवेदनेची, सहृदयतेची जाण असली पाहिजे. संवेदनशीलता हा आपला मूळ स्वभाव असला पाहिजे या सगळ्याची जाणीव स्वतला आणि पर्यायाने वाचणाऱ्याला करून देताना ते म्हणतात-
दरवळू द्या सहवेदना फुलांची
नुसत्याच अत्तराच्या वाहू नका पखाली
या गझलांमध्ये कुठेही अवघड भाषेचा, शब्दांचा, बोजडपणाचा अंतर्भाव नाही. पहिले वहिले पुस्तक असले तर खास काहीतरी गहिरं लिहायचे म्हणून आणलेला आव नाही.
रोजच्या जगण्यातली ही सोपी गझल असली तरी तिचा स्वर गंभीर आहे. गावाकडची पोरगी असते ना- तीचे रूढार्थाने शिक्षण कमी असते, पण लहानपणातच जबाबदाऱ्या अंगावर पडून, रोजच्या जगरहाटीच्या शहाणपणातून, भल्या-बुऱ्या अनुभवातून ती चुणचुणीत झालेली असते, बोलताना समोरच्या वर प्रभाव पाडते तशीच ही गझल वाचकांच्या मनावर एक अमीट छाप सोडते. या संग्रहातील गझलांचा गाभा पिंडी ते ब्रह्मांडी या तत्त्वज्ञानाचा आहे आणि त्या कुठेही कोणालाही काहीही शिकवत नाही, तर विचार करायला भाग पाडतात.
दरवळणारी बाग सुगंधी घरात आहे
तुला कशाला हवेत गजरे नवीन काही
सशक्त गझलेतील सुटे शेर हे स्वतचे असे एक अंगभूत कथानक घेऊन जन्माला येतात आणि वेगवेगळ्या वाटेवरचे प्रवासी असूनसुद्धा एकाच गंतव्याला पोहोचतात. प्रवास समृद्ध करतात. दिवाकर जोशींची गझल ही अशीच आहे. संस्कारांचा एक दिप्तमान टेंभा घेऊन ती पुढे सरकते आहे. जशी जशी पुढे जाईल तशी तशी गझल लेखनातील वाट प्रकाशित करून जाईल.
या संग्रहाला ज्येष्ठ गझलकार वैभव वसंतराव कुलकर्णी (वैवकु) यांची प्रस्तावना लाभली आहे. ज्येष्ठ कवी प्रभाकर साळेगावकर यांचे आशीर्वाद लाभले आहेत आणि नितीन देशमुख यांची पाठराखण आहे. दिवाकर जोशी खूप आधीपासून कसदार गझल लिहीत आहेत आणि आता त्यावर शिक्षणक्षेत्राच्या कौतुकाची थाप पण उमटली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए मराठीच्या तृतीय वर्षासाठी मराठी गझल अभ्यापामासाठी त्यांच्या याच संग्रहातील ‘विठ्ठल माझा निरंतर’ ही गझल पण समाविष्ट केली आहे. या गझलेत ते फार सुंदर पणे शिक्षकाला आकळलेला विठ्ठल मांडतात.
जाऊ तरी कशाला वारीत पंढरीच्या
ज्ञान, तुका, विठोबा जर बालकात दिसतो
हितगुज पाखरांचे वाटे अभंगवाणी
हा रोज संतमेळा मज प्रांगणात दिसतो
दिवाकर जोशींबरोबर गझल रसिकांसाठी ही फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, पण सच्च्या कलाकारासाठी आनंद हा क्षणिक असतो. तो त्याच्या अस्वस्थतेतच मश्गूल असतो आणि म्हणूनच तो उत्तमोत्तम कला आणि साहित्य प्रसवू शकतो. त्याची वेदना हीच त्याची शिदोरी असते व तीच बोचरी सलसुद्धा आणि म्हणूनच त्यांच्या शब्दांतच सांगायचे झाले तर…
बहुतेक वेदनेला फुटला असेल फाटा
आजन्म जीवघेणा सलतो उरात काटा
सलतो उरात काटा (गझलसंग्रह)
कवी : दिवाकर जोशी
प्रकाशक : समग्र प्रकाशन
मूल्य : 200/- रुपये
























































