
नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट का@र्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च शिखर संस्थेचे मुख्यालय दिल्लीतून आता मुंबईत हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक नागरी सहकारी बँका महाराष्ट्रात आणि पश्चिम-दक्षिण भारतात केंद्रित असल्याने, जिथे सहकार क्षेत्राच्या मुख्य हालचाली आहेत त्याच ठिकाणी हे मुख्यालय असायला हवे, असे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज स्पष्ट केले.
मुंबईतील फोर्ट भागातील शारदा सदन येथे ‘एनयूसीएफडीसी’च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते आज झाले. या सोहळ्यानंतर बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘सहकार नवक्रांती’ या कार्यक्रमात शहा म्हणाले, देशात सर्वाधिक 449 नागरी सहकारी बँका एकटय़ा महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये मिळून देशातील 70 टक्के नागरी सहकारी बँका केंद्रित आहेत. त्यामुळे या संपूर्ण क्षेत्राचे कामकाज अधिक सुलभ, जलद आणि प्रभावी व्हावे यासाठी हे मुख्यालय दिल्लीऐवजी मुंबईत असणे गरजेचे होते. देशातील सर्व नागरी सहकारी बँकांनी येत्या वर्षभरात या शिखर संस्थेचे सदस्य व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.






























































