
जागतिक आदिवासी दिनाचा आनंदोत्सव सुरू असतानाच गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील एका अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत अत्यंत संतापजनक व काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आदिवासी दिनाच्या रात्री साधारणतः अडीच वाजण्याच्या सुमारास झोपेत असताना विषारी सापाने सहा मुलींना दंश केला त्यात तीन चिमुरड्या विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेत आणखी तीन मुलींची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनाच्या अनास्थेमुळे आणि वसतिगृहातील ढिसाळ कारभारामुळे आदिवासी लेकरांचा बळी गेल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. सुश्मिता सरोजित मंडल (14), दीपिका एतवा लकडा (12), अनु गजुराम कोरेटी (8) अशी मृत विद्यार्थिनींची नावे आहेत. दीपिका बिटलूरसाय मडावी (11), समृद्धी सुरेश नैताम (14), कविता राजकुमार किरंगा (12) यांच्यावर उपचार सुरू आहेत.




























































