हार्दिकला गळाला लावण्यासाठी दोन संघांची धडपड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलच्या मागील हंगामात कर्णधार आणि खेळाडू म्हणून अपयशी ठरलेला हार्दिक पंडय़ा आता ट्रेडच्या केंद्रस्थानी आला आहे. दुखापतीमुळेही त्याला काही काळ संघाबाहेर राहावे लागले. त्यामुळे आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स अष्टपैलू क्रिकेटर हार्दिकला ट्रेड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

हार्दिकला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स उत्सुक असल्याचे वृत्त आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सची नावेही चर्चेत आहेत; मात्र मुंबईने हार्दिक ट्रेडसाठी उपलब्ध आहे की नाही याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.

मुंबईसमोर मोठा पेच!

हार्दिकच्या बदल्यात काय मिळणार, हा मुंबई संघासमोरचा खरा प्रश्न आहे. ट्रेडमुळे प्रतिस्पर्धी संघ मजबूत होणार नाही याचीही फ्रेंचायझीला काळजी आहे. काही संघांनी मुंबईशी संपर्प साधून प्राथमिक चर्चा केली असली तरी ती अद्याप पुढे गेलेली नाही. हार्दिकची 2024 ते 2026 या काळातील आकडेवारीही फारशी प्रभावी नाही. त्याने एकाही हंगामात 225 धावांचा टप्पा ओलांडलेला नाही आणि फलंदाजीची सरासरी 25 पेक्षा कमी राहिली आहे. त्याने 29 बळी घेतले असले तरी टीम इंडियातील मोजक्या वेगवान गोलंदाजी करणाऱया अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून त्याचे महत्त्व कायम आहे.

चेन्नईची मोठी ऑफर; मुंबईची आणखी मागणी

एका अहवालानुसार, चेन्नईने हार्दिकसाठी शिवम दुबे, देवाल्ड ब्रेविस आणि 10 कोटी रुपये असे पॅकेज देऊ केले आहे. मात्र, मुंबईने युवा फलंदाज आयुष म्हात्रेलाही या पॅकेजमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली. आयुषला सोडण्यास चेन्नई तयार नसल्याने व्यवहार अद्याप रखडला आहे. चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनीही हार्दिक ट्रेडबाबत घाई नसल्याचे स्पष्ट केले. प्रथम नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती केली जाईल आणि त्यानंतर मोठय़ा निर्णयांवर चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले. प्रशिक्षक निवडीसाठी एम.एस. धोनी आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्याशीही सल्लामसलत केली जाणार आहे.

केकेआरकडून कर्णधारपदाची ऑफर’?

केकेआरही हार्दिक पंडय़ाला संघात घेण्यासाठी शर्यतीत उतरला आहे. मात्र, प्रमुख खेळाडूंचा ट्रेड करण्यास तो संघ तयार नसल्याचे वृत्त आहे. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन हा संभाव्य पर्याय मानला जात असला तरी, अॅशेस मालिकेमुळे त्याची संपूर्ण आयपीएल हंगामासाठी उपलब्धता संशयात आहे.

मात्र, केकेआर हार्दिकला थेट कर्णधारपद देऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे ट्रेडच्या शर्यतीत हार्दिकसाठी ही सर्वात आकर्षक ऑफर ठरू शकते. मुंबई इंडियन्स मात्र अद्याप निर्णयाच्या उंबरठय़ावरच आहे.