टी 20 मुंबई लीगमध्ये नवव्या संघाची एण्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई क्रिकेट असोसिएशनने टी 20 मुंबई लीगमध्ये एका नवीन संघाला समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आता नवव्या संघाची बांधणी करण्यासाठी त्यांनी निविदा मागवल्या आहेत. यामुळे लीग आता नऊ संघांची स्पर्धा बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

हा नवीन संघ नवी मुंबई क्षेत्राचे प्रतिनिधित्व करेल, ज्यामुळे लीगचा विस्तार होईल आणि मुंबई व आसपासच्या परिसरातील अधिक क्रिकेटपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. जूनमध्ये पार पडलेल्या लीगच्या यशस्वी चौथ्या हंगामानंतर ही नवीन घडामोड घडली आहे. या हंगामात चाहत्यांचा मोठा प्रतिसाद आणि चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. त्यामुळे या लीगचे स्थान अधिक बळकट झाले आहे. ज्यांना हा संघ घ्यायचा आहे त्या इच्छुकांना 10 ते 25 ऑगस्ट 2026 या कालावधीत, सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत ‘क्रिकेट सेंटर, वानखेडे स्टेडियम, चर्चगेट, मुंबई’ येथील  एमसीए कार्यालयातून निविदा कागदपत्रे मिळू शकतात. पण त्यासाठी इच्छुकांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नावे 2.5 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट भरावा लागेल. तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या निविदा सूचनेत नमूद केलेल्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित करूनही शुल्क भरता येईल.