बस चोरट्याने पळवली, पंक्चर होताच रस्त्यात सोडून दिली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जामनेर परिवहन मंडळाच्या आगाराची नवी कोरी ‘जिजाऊ’ बस अज्ञात चोरट्याने मध्यरात्री पळवून नेल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. एमएच 19, एनई 4214 क्रमांकाची ही बस रविवारी रात्री सुमारे अडीच वाजता आगारातून गायब झाली. त्यानंतर ती जामनेर तालुक्यातील शहापूर गावाजवळील खडकी नदीच्या फरशी पुलावर बंद अवस्थेत आढळून आली. बसचे पुढील चाक पंक्चर झाल्याने संशयिताने ती तेथेच सोडून पलायन केले.

सोमवारी सकाळी शहापूर गावातील ग्रामस्थांना खडकी नदीवरील फरशी पुलावर एसटी महामंडळाची बस उभी असल्याचे दिसले. गावातील रस्त्यावर अशा प्रकारे बस उभी असल्याने ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले. जळगाव-नेरी-जामनेर धावणारी ही बस जामनेर आगाराची असल्याचे समोर आले आणि बस पळवून नेल्याची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. शहापूर गावात जामनेर आगारातील काही चालक व वाहक वास्तव्यास आहेत. फरशी पुलावर बंद अवस्थेत उभ्या असलेल्या बसबाबत माहिती मिळताच बसची पाहणी केल्यानंतर ही बस जामनेर आगारातून गायब झाल्याचे स्पष्ट झाले.