हिंदुस्थानी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अबुधाबीचा मोठा निर्णय, ३१ ऑक्टोबरपर्यंत मोफत व्हिसा जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त अरब अमिरातीला (UAE) भेट देऊ इच्छिणाऱ्या हिंदुस्थानी पर्यटकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. अबुधाबीच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाने hindusthani पर्यटकांसाठी ‘मोफत युएई (UAE) एंट्री व्हिसा’ देण्याची एक विशेष योजना जाहीर केली आहे. यामुळे हिंदुस्थानी नागरिकांना अबुधाबी प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत मिळणार आहे.

योजनेचा कालावधी

ही मोफत व्हिसा सवलत १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत लागू राहील.

मोफत व्हिसा मिळवण्यासाठीच्या प्रमुख अटी:

या मोफत व्हिसा सुविधेचा लाभ मिळवण्यासाठी पर्यटकांना काही अटी पूर्ण कराव्या लागतील:

१. किमान ३ रात्रींचा मुक्काम: पर्यटकांना अबुधाबीमधील कोणत्याही हॉटेलमध्ये सलग किमान तीन रात्री राहण्याचे बुकिंग करणे अनिवार्य आहे.
२. मान्यताप्राप्त एजन्सीमार्फत बुकिंग: हे हॉलिडे पॅकेज बुकिंग या योजनेत सहभागी असलेल्या अधिकृत ट्रॅव्हल एजंट्स किंवा मान्यताप्राप्त ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीजच्या माध्यमातूनच केलेले असावे.
३. परतीचे विमान तिकीट: हिंदुस्थानी पासपोर्ट असलेल्या प्रवाशांकडे हिंदुस्थानात परतण्याचे कन्फर्म विमान तिकीट असणे आवश्यक आहे.

पहिले २०,००० पर्यटक ठरणार लाभार्थी

सध्या ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जात असून, या अंतर्गत सुरुवातीच्या २०,००० हिंदुस्थानी पर्यटकांना हा मोफत व्हिसा दिला जाणार आहे. व्हिसाचा संपूर्ण खर्च स्वतः अबुधाबी पर्यटन विभाग उचलणार असल्याने पर्यटकांची मोठी आर्थिक बचत होणार आहे.

दरम्यान, हिंदुस्थानी पर्यटक मोठ्या संख्येने अबुधाबीला भेट देतात. हिंदुस्थानची बाजारपेठ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अबुधाबी पर्यटन विभागाचे आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स संचालक अब्दुल्ला युसूफ याविषयी म्हणाले, “हिंदुस्थान ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे. हिंदुस्थानी पर्यटकांसाठी अबुधाबीचा प्रवास आणखी सोपा आणि परवडणारा व्हावा, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. व्हिसाचा खर्च वाचल्यामुळे अधिकाधिक हिंदुस्थानी पर्यटक अबुधाबीची संस्कृती आणि इथल्या निसर्गरम्य ठिकाणांचा आनंद घेण्यासाठी येतील, अशी आम्हाला आशा आहे.”