
केडीएमसीच्या ‘स्मार्ट-सिटी’चा पर्दाफाश झाला आहे. डोंबिवली पूर्वेतील मंजूनाथ नागरी आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. अस्वच्छता निर्माण झाल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण व नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रश्नावर शिवसेनेने आवाज उठवला आहे.
मंजूनाथ नागरी आरोग्य केंद्रामध्ये रोज अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचारासाठी येत असतात. या केंद्राच्या प्रवेशद्वारासमोरच कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे यांनीदेखील सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर ही बाब निदर्शनास आणून दिली. तरीदेखील येथील कचराकुंडी न हटवल्याने संताप व्यक्त होत आहे.
परिसर स्वच्छ करा
सध्या पावसाळ्यात या कचऱ्यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे येथील दुर्गंधी तत्काळ हटवावी, आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ करण्यात यावा व कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
आरोग्य केंद्राबाहेरील कचरा न हटवणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. लवकरात लवकर हा कचरा हटवला नाही तर सहाय्यक आयुक्तांच्या दाल नात आम्ही कचरा नेऊन टाकू. म्हणजे दुर्गंधी काय असते हे त्यांना कळेल.
प्रमोद कांबळे, शिवसेना, उपशहरप्रमुख




























































