फुकेट-दिल्ली विमानातील पायलटची डोपिंग चाचणी पॉझिटिव्ह, गेल्या आठवडय़ात टर्ब्युलन्समुळे 17 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

4 ऑगस्ट रोजी फुकेटहून दिल्लीकडे येणाऱया एअर इंडियाच्या विमानाला प्रवासादरम्यान मोठय़ा प्रमाणात टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. या घटनेत विमान अचानक सुमारे 300 फूट खाली आले होते. विमान दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर 13 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्सना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान एक गंभीर बाब उघड झाली आहे. विमानाच्या पॅप्टनची प्रवासानंतर करण्यात आलेली ‘सायकोऑक्टिव्ह सबस्टन्सेस’ म्हणजेच मादक किंवा मनावर परिणाम करणाऱया पदार्थांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समजते. याबाबत एअर इंडिया पंपनीने कोणताही दुजोरा दिलेला नाही किंवा हा दावा फेटाळलेला नाही.

एअर इंडियाच्या प्रवक्ताने सांगितले की, प्रोटोकॉलनुसार, उड्डाणानंतर वैमानिकांची तपासणी करण्यात आली होती. मात्र चाचणीचे निकाल पंपनीसोबत शेअर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आम्ही कोणत्याही निष्कर्षावर टिप्पणी करण्याच्या मनस्थितीत नाही.

या घटनेमुळे विमानाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. फुकेतहून दिल्लीच्या दिशेने येणाऱया एअर इंडियाच्या एअरबस ए320 विमानात 145 प्रवासी होते. ओडिशाच्या आसपासच्या भागातून विमान टर्ब्युलन्सचा धक्का इतका तीव्र होता की, विमान अचानक सुमारे 300 फूट खाली आले. या घटनेनंतर विमानातील काही प्रवासी आणि क्रू मेंबर्स जखमी झाले.

 डीजीसीए या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूची चौकशी करत आहे. चौकशीत हे पाहिले जातेय की, टर्ब्युलन्सदरम्यानची परिस्थिती हाताळण्याची पद्धत योग्य होती की नाही. ही घटना केवळ खराब हवामानामुळे घडली की, यामागे दुसरे काही कारण होते, याचा शोध घेतला जात आहे.