
झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांवरून सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आज आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर झारखंड सरकारने सीजीएल परीक्षा रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. ही परीक्षा न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आली असून यशस्वी उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे. या निर्णयामुळे असंतोष पसरला असून विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याच दरम्यान विद्यार्थी संघटनांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 10 ऑगस्ट रोजी विधानसभेवर शांततापूर्ण मार्गाने मोर्चा काढला जाईल आणि आंदोलन सुरूच राहील असे जाहीर केले आहे. झारखंडचे मंत्री सुदिव्य कुमार सोनू यांनी सांगितले की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सूचनेनुसार सरकारने विद्यार्थ्यांच्या 98 टक्के मागण्या मान्य केल्या आहेत.




























































