
युद्धामुळे पेटलेल्या आखातात शांतता निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेला ‘गाझा करार’ इस्रायलने फेटाळला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांचा प्रस्ताव मान्य नसल्याचे जाहीर केले.
इस्रायलच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्या शांतता मंडळाचा 15 कलमी शांतता करार फेटाळल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, जोपर्यंत मी पंतप्रधान आहे तोपर्यंत गाझा किंवा वेस्ट बँकमध्ये कोणताही पॅलेस्टिनी देश बनणार नाही. हमासला प्रत्यक्षात संपवायचे आहे. हमासचे संपूर्ण निःशस्त्रीकरण होणार नाही तोपर्यंत गाझामधून इस्रायलची सेना माघारी येणार नाही, असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायलने डोनाल्ड ट्रम्प सरकारला आपली ठाम भूमिका कळविली आहे. या कराराबाबत अमेरिकेसोबत चर्चा सुरू आहेत. शांतता कराराबाबत अमेरिकेने दिलेले काही प्रस्ताव इस्रायलला मान्य आहेत तर काही अमान्य आहेत. हमासकडे अजूनही इस्रायलवर हल्ला करण्याची क्षमता आहे. त्यांचे संपूर्ण निःशस्त्रीकरण होत नाही तोवर आम्ही थांबणार नाही, असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले.
असा आहे 15 कलमी गाझा करार
इस्रायल-हमास संघर्ष थांबवण्यासाठी ट्रम्प यांच्या शांतता मंडळाने 31 जुलै रोजी गाझा कराराची घोषणा केली होती. त्यानुसार हमाससह गाझातील सर्व सशस्त्र गट शस्त्रास्त्रs खाली ठेवतील, इस्रायलला सुरक्षा मिळेल, प्रदेशाचा वापर हल्ल्यांसाठीचा तळ म्हणून केला जाणार नाही आणि महत्त्वाचे म्हणजे हमासने शस्त्रे खाली ठेवल्यानंतर इस्रायलचे सैन्य गाझामधून माघार घेईल, असा या करारात उल्लेख होता. कतर, तुकाaये आणि इजिप्त या देशांनी गाझा करारासाठी
मध्यस्थी केली होती.
मोठ्या हल्ल्याची तयारी
गाझा करार फेटाळल्याचे जाहीर केल्यानंतर इस्रायलने इराणवर मोठय़ा हल्ल्याची तयारी सुरू केली आहे. इस्रायलच्या सर्व लष्करी दलातील सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. अमेरिका एकीकडे इराण युद्धातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतानाच इस्रायलने युद्धाची भूमिका कायम ठेवली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निवासस्थानावर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या वेळीदेखील इस्रायलने 48 तास आधी सर्व लष्करी सुट्टय़ा रद्द केल्या होत्या.

























































