
इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा शत्रुराष्ट्रांकडून सातत्याने करण्यात येत होता. मात्र, युद्धानंतर प्रथमच मोजतबा खामेनी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात ते जमिनीवर बसून काही लोकांसोबत चर्चा करताना दिसतात.
सर्वोच्च नेते म्हणून निवड झाल्यानंतर मोजतबा खामेनी यांचा हा पहिलाच व्हिडीओ जगासमोर आला आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने तो जारी केला आहे. मात्र, तो कधी रेकॉर्ड करण्यात आला याची माहिती देण्यात आलेली नाही. खामेनी हे त्यात धडधाकट दिसत आहेत. उपस्थित नेत्यांसोबत ते चर्चा करताना दिसतात. खामेनी यांच्या प्रकृतीबाबत जगभरात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.
खामेनी यांच्या प्रकृतीबाबत दावे फोल
मोजतबा खामेनी हे वडील अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कारातदेखील उपस्थित नव्हते. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचा दावा इस्रायलने केला होता. त्यांचा लवकरच मृत्यू होईल, असाही दावा करण्यात आला होता. सौदी अरबच्या एका वृत्तवाहिनीने खामेनी हे इराणमध्येच नाहीत, असे म्हटले होते.





























































