
परभणी जिल्हा स्त्री रुग्णालयातील उपचार व रेफरल प्रक्रियेतील कथित हलगर्जीपणामुळे सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा तसेच तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रुग्णवाहिकाचालक, डॉक्टर व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिंतूर येथील साठेनगर, नेवाती मोहल्ला येथील शेख अमीन शेख अयुब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी मरजीनाबी अमीन शेख (२२) ही सात महिन्यांची गर्भवती होती. रक्तदाब कमी होणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवारी सायंकाळी तिला परभणी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेसाठी सात वेळा संपर्क करूनही सुमारे दोन तास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यादरम्यान महिलेची प्रकृती अधिक गंभीर झाली. अखेर रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास महिलेचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णवाहिकाचालक केशव यादव, मोहम्मद जलाल, डॉ. अभिजित इप्पर, डॉ. कुलदीप चोरमले आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्मा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०६ (१) व २१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, डॉक्टरांची उपलब्धता, परिचारिकांचे वर्तन आणि रुग्णवाहिका सेवेबाबतही गंभीर आरोप केले आहेत. सुरक्षा रक्षकांकडून रुग्ण व नातेवाईकांशी अरेरावीची भाषा केली जाते, डॉक्टर वेळेवर उपलब्ध राहत नाहीत आणि रुग्णवाहिका वेळेवर येत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. घटनेनंतर नातेवाईकांनी शवविच्छेदन नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात करण्याची मागणी केली. त्यानुसार मृतदेह नांदेड येथे पाठविण्यात आला असून, रविवारी ‘इन कॅमेरा’ पद्धतीने शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.
गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी महापौरांचा आक्रमक पवित्रा
जिल्हा स्त्री रुग्णालयातील कथित हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला व तिच्या गर्भातील बाळाच्या मृत्यूप्रकरणी महापौर सय्यद एकबाल यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला व ते म्हणाले की, मृतदेह नांदेडला पाठवून कॅमेऱ्याच्या निगराणीखाली शवविच्छेदन केले जाणर, दोषी डॉक्टर किंवा रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, कोणतीही तडजोड नाही. रुग्णवाहिका दोन तास उशिरा आल्याच्या आरोपाची गंभीर दखल घेतली जाणार आणि मृत महिलेच्या कुटुंबीयांना महानगरपालिकेचा पूर्ण पाठिंबा राहणार.
सय्यद इकबाल, महापौर, महानगरपालिका परभणी.




























































