
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकशाहीत अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत दुःखद आणि निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले. अखिलेश यादव म्हणाले, “ममता बॅनर्जी या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. अशा नेत्यासोबत ज्या प्रकारचे वर्तन करण्यात आले, ते अत्यंत निंदनीय आहे. लोकशाहीत अशी घटना घडणे दुःखद आहे.”
एबीपी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेमागे सरकारचा हात असल्याचे सिद्ध झाले, तर ते आणखी गंभीर असल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले. “सरकारे येतात आणि जातात; मात्र निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांचा अशा प्रकारे अपमान कसा केला जाऊ शकतो? त्यांना सुरक्षा देणे आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही सरकारची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.
अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक पराभवाचाही संदर्भ दिला. केंद्रीय दल तैनात झाले नसते, तर कदाचित त्या निवडणुकीत पराभूत झाल्या नसत्या, असा दावा त्यांनी केला.
9 ऑगस्टला पश्चिम बंगालमधील हलिसाहार येथे एका टीएमसी कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी गेल्या होत्या. संबंधित कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीत कथितरीत्या मृत्यू झाल्याचे प्रकरण चर्चेत आहे. ममता बॅनर्जी घटनास्थळी जात असताना त्यांच्या ताफ्याला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. स्थानिकांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी आंदोलकांनी गाडीवर चिखलफेक केल्याचा तसेच चपला आणि बूट फेकल्याचा दावा करण्यात आला. ममता बॅनर्जी यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि शिवीगाळही करण्यात आल्याचे समोर आले. या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांनी थेट भाजपवर आरोप केला. हा विरोध स्थानिक गावकऱ्यांनी केला नसून भाजपच्या कार्यकर्त्यांनी किंवा समर्थकांनी घडवून आणल्याचा दावा त्यांनी केला.





























































