नाशिक खड्ड्यात घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर नेटिझन्सची टीका, सोशल मीडियावर रॅप साँग, मिम्स, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांगल्या वातावरणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिक शहराला महापालिकेतील सत्ताधारी भाजपने अक्षरशः खड्ड्यात घातले आहे, कुठेही जा रस्ते खोदलेले आहेत, त्यांची चाळण झाली आहे. रोजचे जगणे धोक्यात आले असताना ‘सहा महिन्यांनी शहराचा कायापालट होईल’ असे सांगून नियोजनशून्य, भ्रष्ट कारभारावर पांघरूण घालणाऱ्या मंत्री, अधिकाऱ्यांवर नाशिककर संतापणार नाहीत तर काय करणार? तरुणाईने तर सोशल मीडियावरून टीकेची झोडच उठवली आहे. रॅप साँग, मिम्स, रिल्स, उपहासात्मक व्हिडीओंतून संताप व्यक्त केला आहे. खड्डे हाच ट्रेंडींग विषय झाला आहे. तरुणाई ‘लाईव्ह’ करून दुरुस्ती कामांची पोलखोल करीत आहे, अशाप्रकारे जगभर इथले खड्डे गाजू लागल्याने येता-जाता भूलथापा देणाऱ्या सत्ताधाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

शहरातील रस्त्यांची कधी नव्हे इतकी दुर्दशा झाली आहे. विकासकामांच्या नावाखाली बहुतांश रस्ते एकाच वेळी खोदून ठेवलेले आहेत, उर्वरित रस्त्यांवर अतिरिक्त ताण आल्याने वाहतूक कोंडी डोकेदुखी झाली आहे. त्यात भर म्हणजे खड्ड्यांनी रस्त्यांची चाळण झाल्याने जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. खड्डे अपघातात सहा जणांचा बळी गेला असून, अनेक गंभीर जखमी झाले आहेत. संयम संपल्याने शहरवासीयांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. यात तरुणाई आघाडीवर आहे, त्यांच्या कल्पनाशक्तीला उधाण आले असून, सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी भाजप, एकनाथ शिंदे गटाविरुद्ध लढाच पुकारल्याचे चित्र आहे.

 इन्स्टाग्रामवरील आम्ही नाशिककर या पेजवरचे ‘नाशिकची परिस्थिती खड्ड्यात आहे’, हे रॅप साँग चांगलेच चर्चेत आहे. ‘एक काम पूर्ण नाही, चार रस्ते खोदून, लोकांचा जीव घातला धोक्यात, गुन्हेगारी आणि बाकी राहिलं बाजूला, नाशिक फेमस खड्ड्यात’ यातून वाताहात मांडली आहे.

 आय लव्ह नाशिक या पेजवरचे ‘नाशिकचे खड्डे कसे गोल गोल’नेही बेफिकीर प्रशासनाचा समाचार घेतला आहे. एआय व्हिडीओ तयार करून नेटिझन्सने सत्ताधाऱ्यांना चपराक दिली आहे. अंतराळवीर शहरातील रस्त्यावरून चालला आहे, चंद्रावर जाण्याची प्रॅक्टिस इथल्या खड्ड्यांतच होते, असा चांगलाच टोला हाणला आहे.