मुलीला शिवीगाळ करून कानशिलात लगावणे ‘पोक्सो’ गुन्हा नाही! उच्च न्यायालयाचे मत, विनयभंग, मारहाणीचा खटला चालणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शारीरिक अत्याचाराचा हेतू नसल्यास अल्पवयीन मुलीला केलेली शिवीगाळ व कानशिलात लगावणे पोक्सोअंतर्गत गुन्हा होत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

एका मुलाने त्याच्या शाळेतील मुलीला रस्त्यात गाठले. तू माझ्याबद्दल मुलींना काय सांगतेस असे विचारत तिला शिवीगाळ केली. तिच्या कानशिलात लगावली. मुलीने याची पोलिसांत तक्रार केली. विनयभंग, मारहाण व पोक्सोअंतर्गत पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला. मात्र या घटनेत पोक्सोचे कलम लागू होणार नाही, असा दावा करत आरोपी मुलाने याचिका दाखल केली.

न्या. शिवकुमार दिघे यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. आरोपी व पीडितामध्ये वादावादी झाली. त्यातून ही घटना घडली आहे. शारीरिक अत्याचाराच्या हेतूने एखाद्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्यास पोक्सोचा गुन्हा नोंदवला जातो. या घटनेत असे काहीच घडलेले नाही. मुलाने रागाने पीडितेला शिवीगाळ केली व तिला मारले. तेव्हा पोक्सोचा गुन्हा रद्द करावा, अशी विनंती मुलाकडून करण्यात आली. ती मान्य करत न्यायालयाने पोक्सोचा गुन्हा रद्द केला. विनयभंग व मारहाणीच्या आरोपाचा खटला चालेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

पोलिसांचा विरोध

पोक्सोचा गुन्हा रद्द करण्याला पोलिसांनी विरोध केला होता. मुलाने शिवीगाळ करून पीडितेला मारले. या कृतीमागे अत्याचार करण्याचीच भावना होती. परिणामी पोक्सोचा गुन्हा रद्द करू नये, असे पोलिसांचे म्हणणे होते. ते न्यायालयाने मान्य केले नाही.