अमेरिकेत प्रेयसीची गळा आवळून हत्या, मायदेशी पळण्याच्या तयारीत असलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्याला जर्मनीत ठोकल्या बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील ॲरिझोना विद्यापीठाजवळ राहणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृण हत्या करून देशाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या 20 वर्षीय हिंदुस्थानी तरुणाला जर्मनीमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वरुण बॅचियारी असे आरोपीचे नाव असून त्याने आपली प्रेयसी जुलिसा रुबी सालाझार हिची गळा आवळून हत्या केल्याचा संशय आहे. इंडिया टूडेने याबाबत वृत्त दिले आहे.

जुलिसा हिच्याशी संपर्क होत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. गुरुवारी दुपारी टक्सन पोलीस तिच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचले असता जुलिसा मृतावस्थेत आढळून आली. तिच्या शरीरावर गंभीर दुखापतींच्या खुणा होत्या. हत्येनंतर आरोपीने तिचे क्रेडिट कार्ड आणि मोबाईल फोन चोरून तिच्या आईला बनावट मेसेज पाठवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलीस तपासात समोर आले.

दरम्यान, प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी वरुण टक्सन विमानतळावरून ह्युस्टनला पोहोचला आणि तिथून बर्लिनला जाणाऱ्या विमानात बसला. बर्लिनवरून तो थेट हिंदुस्थानात पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, ॲरिझोना पोलीस आणि अमेरिकेच्या फेडरल एजंट्सनी आंतरराष्ट्रीय यंत्रणांशी संपर्क साधून त्याचा माग काढला. तो जर्मनीमध्ये उतरताच त्याला ताब्यात घेण्यात आले. आता त्याचे अमेरिकेत प्रत्यार्पण केले जाणार असून त्याच्यावर प्रथम श्रेणी हत्येचा खटला चालवला जाईल.

स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित जुलिसा आरोपी वरुणसोबतचे सर्व संबंध संपवण्याच्या विचारात होती. वरुण तिच्यावर लैंगिक अत्याचार व कौटुंबिक हिंसाचार करत असल्याचा आरोपही केला जात आहे. गेल्या 5 ऑगस्ट रोजी जुलिसाच्या खोलीतून मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला होता. मात्र तिच्या फोनवरून सर्व काही ठीक आहे असा मेसेज पाठवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

गुन्हेगारी पार्श्वभूमी अन् विद्यापीठातून हकालपट्टी

वरुण ॲरिझोना विद्यापीठात बिजनेस ॲनालिटिक्सचे शिक्षण घेत होता. मात्र, एका मारामारीच्या घटनेनंतर त्याची विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली होती. याशिवाय 26 मे रोजी त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता, तर एका अन्य महिलेनेही त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. अलिकडेच त्याची नोकरी गेल्याने त्याला घराचे भाडे देणे कठीण झाले होते आणि त्याच्या व्हिसाचा प्रश्नही निर्माण झाला होता. पोलीस या सर्व बाबींचा अधिक तपास करत आहेत.