दिल्ली डायरी – ‘हक्का’च्या मतदारांचा भाजपला दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या साडेतीन दशकांच्या परंपरागत मतदारसंघातच कायस्थ समाजाच्या कोअर व्होटरने विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला दणका दिला. असाच तडाखा मध्य प्रदेशच्या दतियामध्ये भाजपला ब्राह्मण मतदारांकडून बसला. त्यांनी तेथे काँग्रेसच्या राजपूत उमेदवाराला निवडून दिले. भाजपने आपल्या कोअर व्होटरला गृहित धरले. बांकीपूर व दतिया पोटनिवडणुकीच्या निकालाने हा उन्मतपणा संपवला आहे.

आपल्या पक्षाचा हक्काचा मतदार जाऊन जाऊन जाणार कुठे, त्याला आपल्याशिवाय पर्याय कुठे आहे? अशा आविर्भावात गेली बारा वर्षे वागणाऱ्या भाजपचे ‘तारे जमीं पर’ आणले ते दतिया व बांकीपूरच्या पोटनिवडणुकीने. देशभरात पक्षविस्ताराच्या नावाखाली जी खोगीरभरती भाजपने केली त्यामुळे पक्षातील निष्ठावंत दुखावले होते. विचारधारेच्या लोकांना बाजूला सारून आयात लोकांना पक्षात मानाचे पान वाढण्यात आले. पक्षाचा सामाजिक पाया व्यापक करायचा आहे, त्यासाठी त्याग करण्याची तयारी ठेवा, असा मूलमंत्र देण्यात आला. तो निष्ठावंतांनी पाळला पण त्या बदल्यात पडली ती निराशा. आयतोबांची पालखी वाहता वाहता पक्षाची विचारधारा वाहत चालली आहे, हे लक्षात आल्यानंतर आणि हिंदुत्वाच्या नावावर हे सगळे सहन करण्याची सहनशक्ती संपल्यानंतर भाजपच्या कोअर व्होटरने बांकीपूर व दतियामध्ये भाजपला जोरदार दणका दिला आहे.

बिहारमधील बांकीपूर हा भाजपचा बालेकिल्ला. नितीन नबीन तब्बल पाच वेळा तिथून मतदार म्हणून निवडून आले. त्यापूर्वी त्यांचे वडील निवडून यायचे. या निवडणुकीत भाजपने अगोदर एक उमेदवार उतरवला. अर्ध्या तासांत त्याचे तिकीट कापून दुसऱयाच कोणाला संधी दिली गेली. भाजपातील अंतर्गत गोंधळाच्या स्थितीचा व जनतेच्या नाराजीचा अंदाज प्रशांत किशोर यांनी अचूक हेरला आणि इतिहास घडविला. कायस्थ हा भाजपचा परंपरागत ‘कोअर व्होटर’. त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनही त्याच समाजाचे. मात्र भाजप फसवत असल्याच्या रागातून या समाजाने भाजपला नाकारले. ब्राह्मण समाजाची अवस्था तर त्याहूनही बिकट आहे. ‘हिंदुत्व व विचारधारा’ या गोंडस शब्दांखाली केलेले भाजपचे दुर्लक्ष या समाजाने अनेक दिवस सहन केले. ब्राह्मणांचे वर्चस्व असलेल्या उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याऐवजी योगींना मुख्यमंत्री करण्यात आले. योगींनी ब्राह्मणांना जाणीवपूर्वक टार्गेट करून त्यांचे वर्चस्व मोडीत काढले. मध्य प्रदेशसह इतर राज्यांमध्येही हीच स्थिती होती. या सगळ्याची परिसीमा झाल्यानंतर उत्तरेतल्या ब्राह्मणांनी बंडाची भूमिका घेतली. जागोजागी मेसेज फिरले. जे नरोत्तम मिश्रा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले असते त्यांचे तिकीट कापले गेले. पोटनिवडणुकीच्या पोटातून असंतोषाचा हा लाव्हा बाहेर पडला. कोअर व्होटरने दणका देऊन भाजपला ताळ्यावर आणले आहे हेच खरे.

पीके इज बॅक!

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी पूर्ण ताकदीने लढत दिली. मात्र ‘इलेक्शन गुरू’ मानल्या जाणाऱया किशोर यांची दांडी या निवडणुकीने गुल केली होती. जो तो किशोर यांना टपल्या मारायचा. प्रशांत किशोर काँगेसमध्ये जातील, अशाही चर्चा रंगल्या. किशोर यांची अवस्था जखमी झालेल्या वाघासारखी झाली होती. पण तो शिकारीची संधी शोधत होता. ही संधी त्यांना निव्वळ नशिबाने मिळाली. नितीन नबीन हे कोणाच्याही ध्यानीमनी नसलेल्या माणसाला भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमले. नबीन तिथले स्थानिक आमदार. राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या पदाला साजेसे असे राज्यसभा सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आले. त्यामुळे नबीन यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या बांकीपूरमध्ये पोटनिवडणूक झाली. कायस्थांचा बोलबाला असलेल्या या मतदारसंघात नबीन देतील तो माणूस निवडून येईल, अशी स्थिती होती. मात्र किशोर यांनी भाजपविरोधातील नाराजीचा अचूक फायदा उचलत ‘आपको कुत्ता बिल्ली की नही, काम करने वाले विधायक की जरूरत है’ असा नारा देत निवडणूक फिरवली. पीके यांचे पुनरागमन अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. पीके बिहार व देशात नबीन राजकीय पर्याय देण्यात यशस्वी ठरतात का, ते यथावकाश कळेलच.

मोहन यादवांचे काय होईल?

दतिया पोटनिवडणुकीतील भाजपच्या दारुण पराभवानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचे काय होईल? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रांचे तिकीट कापण्यापासून निवडणूक हाताळण्यापर्यंत सगळी जबाबदारी मोहन यादवांकडे होती. त्यात ते सपशेल अपयशी ठरले. मोठय़ा प्रमाणात सरकारी यंत्रणेचा वापर करूनही भाजपने उमेदवारी दिलेले घनशाम तिवारी मोठय़ा फरकाने हरले. मोहन यादव जमीन घोटाळ्यावरून तसेही वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. नरोत्तम मिश्रा हे अमित शहांचे खास समर्थक मानले जातात. एकेकाळी ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा होत्या. मात्र मिश्रांचा पत्ता कापण्यात त्यांचे विरोधक यशस्वी झाले. सगळे खापर मोहन यादवांवर माथी फुटले. उत्तर प्रदेशमधील ‘यादव व्होट बँक’ लक्षात घेऊन भाजपने ओबीसी मोहन यादवांना मुख्यमंत्री बनवले. आता नेमक्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे यादवांना हटवतील की नाही, याबद्दल साशंकता आहे. दतिया पोटनिवडणुकीचा निकाल हा हलक्यात घेण्यासारखा नक्कीच नाही. मध्य प्रदेशमध्ये काँगेसची अवस्था मृतप्राय अशी आहे. उरलीसुरली काँगेस संपविण्याची जबाबदारी दिग्विजयसिंग व कमलनाथ हे दोन माजी मुख्यमंत्री इमानेइतबारे पार पाडत आहेत. अशा स्थितीत काँगेसचा उमेदवार मध्य प्रदेशात जिंकणे म्हणजे जगातले आठवे आश्चर्य असण्यासारखी स्थिती होती. मात्र हे घडले. नरोत्तम मिश्रांनी काँगेसला मध्य प्रदेशात जीवदान दिले आहे. या स्थितीत काँग्रेस पुन्हा मजबूत होऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री मोहन यादवांना उत्तर प्रदेशची निवडणूक वाचवते की सवर्णांची नाराजी डुबवते, ते काही दिवसांतच स्पष्ट होईल.