उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील स्कॉर्पिओची धडक; रस्ता ओलांडणाऱ्या कामगाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये शनिवारी रात्री एका भीषण अपघातात 55 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. भरत कापेर असे त्यांचे नाव असून ते मूळचे बिहारचे रहिवाशी होते. कामानिमीत्त भरत जम्मू कश्मीरमध्ये राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, दरम्यान शनिवारी रात्रीच्या वेळेस रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मूच्या बाहेरील भागात असलेल्या गंज्याल येथे ही दुर्घटना घडली. रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एका स्कॉर्पिओ कारने भरत कापेर यांना धडक दिली. ही कार जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांच्या ताफ्यातील असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी सोडून ताफा परत येत असताना हा अपघात घडला. अपघातानंतर गाडीच्या चालकाने तातडीने खाली उतरून जखमीला सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटना समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनेचा तपास सुरू केला. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला असून, अपघाताची नेमकी परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी कसून तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे रात्रीच्या वेळी शहरी भागात व्हीआयपी ताफ्यांच्या वेगाबद्दल आणि रस्त्यावरील सुरक्षेविषयी गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.