
इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या प्रकृती आणि त्यांच्या ठिकाणाबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा रंगल्या आहेत. याचदरम्यान इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘मेहर न्यूज’ने एक नवीन व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये मोजतबा खामेनी पूर्णपणे स्वस्थ दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून इस्रायली मीडियामध्ये मोजतबा खामेनींच्या प्रकृतीबाबत गंभीर दावे केले जात असतानाच हा व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत अनेक बातम्या समोर आल्या. मोजतबा खामेनी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला आहे. इस्रायलच्या ‘चॅनल 14’ आणि ‘जेरुसलेम पोस्ट’ने ‘इराणवायर’ या वृत्तसंस्थेच्या आणि राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या प्रशासनातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या प्रशासनामध्ये मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत गंभीर चर्चा सुरू असून, लवकरच त्यांच्या निधनाची बातमी आल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी भीती सूत्रांनी व्यक्त केली होती. मात्र ‘मेहर न्यूज’ने हा व्हिडिओ जारी करून या सर्व अफवा आणि दाव्यांना फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान मेहर न्यूजने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये मोजतबा खामेनी पूर्णपणे सवस्थ दिसत आहेत. मोजतबा यांच्यासोबत इतर काही लोक असून ते सगळे एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत. मात्र, खामेनी यांच्या या व्हिडिओची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे माध्यमांनी केलेले दावे चुकीचे ठरवण्यासाठी इराणी सरकारने हा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याची शक्यता वर्तवली जातेय.
अमेरिकन आणि इस्रायली संयुक्त लष्करी हल्ल्यात आपले वडील अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर मोजतबा खामेनेई यांनी सर्वोच्च नेतेपदाची सूत्रे हाती घेतली होती. पदभार स्वीकारल्यापासून ते प्रत्यक्ष लोकांसमोर आलेले नव्हते. मात्र लिखित निवेदनांच्या माध्यमातूनच ते आपले विचार मांडत होते. सुरुवातीच्या लष्करी हल्ल्यांमध्ये मोजतबा खामेनेई गंभीर जखमी झाले होते आणि त्यांच्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना लपून राहावे लागत आहे, असा दावा याआधीच्या अहवालांमध्ये करण्यात आला होता.



























































