
कॅनडाच्या टोरांटो शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंदुस्थानी वंशाच्या 30 वर्षीय हिमांशी खुराना हिच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी सात महिन्यांनी एका संशयिताला अटक केली आहे. अब्दुल गफूरी असे अटक केलेल्या 32वर्षीय आरोपीचे नाव आहे. अब्दुल मृत हिमांशीचा पार्टनर असल्याचे तपासात समोर आले आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी म्हणजेच 20 डिसेंबर 2025 रोजी हिमांशी खुराना हिचा मृतदेह टोरांटोमधील एका घरामध्ये संशयित अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता तिचा मृतदेह सापडला आणि हा हत्येचा प्रकार असल्याचे उघड झाले. या घटनेनंतर पोलिसांनी याला घरगुती हिंसेचे प्रकरण असल्याचे स्पष्ट करत कसून चौकशी सुरू केली.
चौकशीदरम्यान पोलिसांना अब्दुल गफूरीवर संशल आला. यामुळे अब्दुलवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याच्याविरोधात संपूर्ण कॅनडामध्ये वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, तो घटनेनंतर फरार झाला होता आणि पोलीस त्याचा सतत शोध घेत होते. अखेर सात महिन्यांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर कॅनडा पोलिसांना मोठे यश आले आहे. स्थानिक पोलिसांच्या पथकाने आंतरराष्ट्रीय यंत्रणांच्या मदतीने फरार आरोपी अब्दुल गफूरी याला टोरांटो विमानतळावरून बेड्या ठोकल्या. तो विमानतळावर येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
या दुर्दैवी घटनेमुळे मृताच्या कुटुंबात मोठी शोककळा पसरली आहे. टोरोंटोमधील हिंदुस्थानी नागरिकांनी या हत्येवर तीव्र शोक व्यक्त केला असून, पिडीत कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली जात असल्याची माहिती दिली आहे.




























































