ट्रम्प यांचा १५ कलमी ‘गाझा शांतता प्रस्ताव’ इस्रायलने फेटाळला, हमासने शस्त्रे टाकेपर्यंत माघार नाही – नेतन्याहू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवलेला १५ कलमी गाझा शांतता प्रस्ताव इस्रायलने फेटाळून लावला आहे. जोपर्यंत हमासचे संपूर्णपणे आणि खऱ्या अर्थाने निःशस्त्रीकरण होत नाही, तोपर्यंत इस्रायली सैन्य गाझामधून माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केली आहे.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, रविवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत नेतन्याहू म्हणाले आहेत की, इस्रायल हा १५ कलमी दस्तऐवज फेटाळत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी हमासने या प्रस्तावाला सहमती दर्शवली होती. मात्र हमासकडे असलेली सर्व प्रकारची जड आणि हलकी शस्त्रे जोपर्यंत नष्ट केली जात नाहीत, तोपर्यंत गाझामधून सैन्य मागे घेतले जाणार नाही, असे नेतन्याहू म्हणाले. आम्हाला दिखाव्यापुरते नाही, तर खऱ्या अर्थाने निःशस्त्रीकरण हवे आहे आणि नागरिकांवरील तसेच सैन्यावरील धोके आम्ही मोडून काढू, असा इशाराही त्यांनी दिला. यासोबतच आपण पंतप्रधान असेपर्यंत गाझा किंवा वेस्ट बँक येथे स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्याची स्थापना कधीही होऊ देणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या १५ कलमी आराखड्यात गाझामधील युद्ध थांबवण्यासाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. यामध्ये सशस्त्र गटांचे निःशस्त्रीकरण करणे, इस्रायली सैन्याने टप्प्याटप्प्याने माघार घेणे आणि गाझाचा कारभार एका पॅलेस्टिनी प्रशासकीय समितीकडे सोपवणे या बाबींचा समावेश आहे. या प्रस्तावातील काही मुद्द्यांवर इस्रायलचे आक्षेप असले तरी अमेरिकेशी यावर चर्चा सुरू असल्याचे नेतन्याहू यांनी सांगितले.