
पश्चिम बंगालमधील हलिसाहार येथे माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्या ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्यादरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले. ममता बॅनर्जी या हलिसाहार येथे पोलिसांच्या ताब्यात मृत्यू झालेल्या तृणमूल कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. ममता बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या वाहनावर मोठ्या विटा आणि दगड फेकण्यात आले. आंदोलकांनी गाडीवर चिखल फासला, तसेच बूट आणि चपला फेकल्या. यावेळी त्यांना शिवीगाळ करत ‘चोर’ अशा घोषणा देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.
एबीपी ने दिलेल्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी या हलिसाहार येथे पोलिसांच्या ताब्यात मृत्यू झालेल्या तृणमूल कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेल्या असताना, त्यांच्या ताफ्याला काही ठिकाणी विरोधाचा सामना करावा लागला. गाडी थांबवण्यात आल्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली. यानंतर त्यांच्या वाहनावर चिखल, चपला आणि दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांनी थेट भाजपवर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, या आंदोलनामागे स्थानिक गावकरी नसून बाहेरून आणलेले भाजपचे कार्यकर्ते आणि गुंड होते. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्या गाडीवर मोठमोठ्या विटा आणि दगड फेकण्यात आले. या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध केला.
ममता बॅनर्जी यांनी पोलिसांच्या ताब्यात मृत्यू झालेल्या तृणमूल कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांनाही धमकावले जात असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, संबंधित कुटुंबाला भेटण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते आणि त्यानुसार त्या तिथे पोहोचल्या. मात्र, त्यांच्या येण्यापूर्वीच कुटुंबीयांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ममता यांनी दावा केला की, पोलिसांच्या उपस्थितीतच त्यांच्या वाहनावर दगडफेक झाली. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. राज्यात अराजकता वाढत असून पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच बंगाल आता गुंडांच्या हातात गेला आहे, असा आरोप करत त्यांनी राज्य सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर टीका केली. तसेच या संपूर्ण घटनेमागे भाजप पुरस्कृत हिंसाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला.



























































