
निरोगी आणि सक्षम शरीरासाठी जीवनसत्त्वांसोबतच विविध खनिजांचीही अत्यंत आवश्यकता असते. या अत्यावश्यक खनिजांमध्ये आयोडीन हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. शरीराची योग्य वाढ, मेंदूचा विकास, चयापचय (मेटाबॉलिझम) आणि दैनंदिन ऊर्जा टिकवून ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या शारीरिक कार्यांमध्ये आयोडीनची महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने शरीरात आयोडीनचे योग्य प्रमाण असणे अनिवार्य आहे.
मात्र, दीर्घकाळ आयोडीनची कमतरता राहिल्यास थायरॉईड ग्रंथींशी संबंधित गंभीर आजार उद्भवू शकतात. विशेषतः गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या स्त्रिया आणि आहारात मीठाचा कमी वापर करणाऱ्या व्यक्तींना याचा अधिक धोका असतो. गर्भधारणेदरम्यान आणि लहान मुलांमध्ये आयोडीनची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा विपरीत परिणाम शारीरिक व मानसिक वाढीवर होऊ शकतो. म्हणूनच, आयोडीनच्या कमतरतेमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम, त्याची मुख्य लक्षणे आणि आयोडीनची पातळी संतुलित ठेवण्यासाठी आहारात कशाचा समावेश करावा, याविषयी सविस्तर जाणून घ्या.
आयोडीनच्या कमतरतेची मुख्य लक्षणे
- थायरॉईड ग्रंथीचा आकार वाढल्यामुळे मानेच्या पुढील भागात सूज दिसून येते.
- शरीरातील ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया मंदावल्याने सतत थकवा जाणवतो.
- आहार मर्यादित असला तरी अचानक आणि अनपेक्षितपणे वजन वाढू लागते.
- त्वचा कोरडी पडणे, तीव्र प्रमाणात केस गळणे.
- जास्त थंडी वाजणे, बद्धकोष्ठता तसेच लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे.
ही लक्षणे इतरही काही आजारांशी संबंधित असू शकतात, त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
आयोडीनची पातळी संतुलित ठेवण्यासाठी काय खावे?
- दैनंदिन स्वयंपाकात आयोडीनयुक्त मीठाचा वापर करणे.
- दूध, दही आणि चीज यांमध्ये मुबलक प्रमाणात आयोडीन असते.
- मांसाहारी आणि अंडी तसेच विविध प्रकारचे मासे हे आयोडीनचे उत्तम स्त्रोत आहेत.


























































