
उत्तर प्रदेशातून एक अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सेवत विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार ज्ञान तिवारी यांनी आपल्या मुलीची फसवणूक झाल्याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली आहे. त्यांचा जावई प्रखर त्रिवेदी याने बनावट ओळखीचा वापर करून विविध राज्यांत अनेक महिलांची फसवणूक केली असून, त्याने आतापर्यंत जवळपास 25 लग्न केल्याचा गंभीर आरोप आमदारांनी केला आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी रेउसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मुख्य आरोपी प्रखर त्रिवेदी आणि त्याचे वडील अनुज त्रिवेदी यांना अटक केली आहे. आमदारांनी 6 ऑगस्ट रोजी आपल्या मुलीसोबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून या सर्व प्रकरणाचा माहिती दिली.
नेमके प्रकरण काय?
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आमदार ज्ञान तिवारी यांची मुलगी प्रज्ञा हिचा विवाह 2024 मध्ये मिसरिख मधील चंद्रावाल येथे राहणाऱ्या अनुज त्रिवेदी याचा मुलगा प्रखर त्रिवेदी याच्याशी झाला होता. विवाहाच्या वेळी अनुज त्रिवेदीने स्वतःची ओळख मुंबईतील एक प्रतिष्ठित रिअल इस्टेट व्यावसायिक अशी करून दिली होती आणि आपल्या कुटुंबाचा व मुलाचा गुन्हेगारी इतिहास लपवून ठेवला होता. स्थानिक पातळीवर चौकशी करून आणि प्रतिष्ठित लोकांच्या सल्ल्यानुसार हा विवाह ठरवण्यात आला होता. मात्र, लग्नाच्या अडीच वर्षांनंतर सोशल मीडिया आणि इतर स्त्रोतांच्या माध्यमातून प्रखर त्रिवेदीच्या काळ्या कारभाराची माहिती तिवारी कुटुंबाला मिळाली.
त्रिवेदीने बनावट ओळखीच्या आधारे महाराष्ट्रसह विविध राज्यांतील अनेक महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असल्याचे आमदारांनी म्हटले आहे. तसेच त्याने अशा प्रकारे तब्बल 25 विवाह केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर आमदारांनी आरोपी कुटुंबाशी सर्व संबंध तोडले असून आपल्या मुलीला सुखरूप घरी परत आणले आहे. या घटनेमुळे आपल्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसल्याचे आणि एका लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सामाजिक प्रतिमेलाही धक्का पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई तीव्र केली असून पिता-पुत्रास बेड्या ठोकल्या आहेत. दोषी आढळल्यास जावयाला कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आमदार ज्ञान तिवारी यांनी केली आहे.
























































