
हॉलीवूडचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन 10 दिवस पूर्ण झाले असून, हिंदुस्थानात चित्रपटाने कमाईचा मोठा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाच्या कमाईचा वेग कायम असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या शनिवारी हिंदुस्थानात सुमारे ₹31 कोटींची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाचे 10 दिवसांनंतरचे नेट कलेक्शन सुमारे ₹380.75 कोटींवर पोहोचले आहे.
हिंदुस्थानातील ग्रॉस कलेक्शन ₹455 कोटींवर गेले आहे. चित्रपटाच्या कमाईचा हा वेग पाहता लवकरच तो ₹500 कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पहिल्या आठवड्यात दमदार कमाई केल्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाच्या शोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंदुस्थानात हॉलीवूड चित्रपटांच्या कमाईचा विचार केला, तर ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ने अल्पावधीतच अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकल्याचा दावा केला जात आहे. हिंदुस्थानासोबतच परदेशातील बॉक्स ऑफिसवरही ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ची दमदार कामगिरी सुरू आहे. उपलब्ध अहवालांनुसार चित्रपटाने जगभरातही मोठी कमाई केली आहे. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.
हिंदुस्थानात ₹455 कोटींपेक्षा जास्त ग्रॉस कलेक्शन केल्यानंतर आता ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ची नजर ₹500 कोटींच्या टप्प्यावर आहे. आगामी दिवसांत कमाईचा वेग कायम राहिल्यास हा टप्पा लवकरच पार होण्याची शक्यता आहे. स्पायडर-मॅनच्या चाहत्यांचा उत्साह आणि दुसऱ्या आठवड्यातही मिळणारा प्रतिसाद पाहता, हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हॉलीवूड चित्रपटांच्या यादीत आणखी वर जाण्याची शक्यता आहे.


























































