बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा! ममता बॅनर्जींवरील हल्ल्यानंतर अभिषेक बॅनर्जींचा भाजपवर घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत, बंगालमध्ये भाजपच्या राजवटीत कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा’ उडाला असल्याची घणाघाती टीका अभिषेक बॅनर्जी यांनी केली. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर २४ परगणा जिल्ह्यात पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या एका टीएमसी कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ममता बॅनर्जी जात होत्या. त्यावेळी वाटेत त्यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यातून ममता बॅनर्जी थोडक्यात बचावल्या.

या घटनेवर संताप व्यक्त करताना अभिषेक बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ते म्हणाले, “भाजप सरकारच्या काळात बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे पूर्णपणे पतन झाले आहे. आमच्या कार्यकर्त्यांची दिवसाढवळ्या हत्या केली जात आहे आणि पोलीस कोठडीत लोकांचे मृत्यू होत आहेत, तरीही कोणाला न्याय मिळत नाहीये.”

त्यांनी भाजपवर गुंडगिरीचा आरोप करत म्हटले, “एका दुःखी कुटुंबाला भेटायला जाणाऱ्या राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांवर भाजपने पोसलेल्या गुंडांकडून क्रूरपणे हल्ला केला जातो. ममता बॅनर्जी यात गंभीर जखमी होऊ शकल्या असत्या. यापूर्वी त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि आता आमच्या नेत्यावर हल्ला करत आहेत. अशा भयंकर गोष्टी होऊ देणारे हे कसे सरकार आहे?”

यावेळी अभिषेक बॅनर्जी यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही कडक ताशेरे ओढले. ते म्हणाले, “जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होतात, तेव्हा पोलीस गायब असतात. एका कुटुंबाला संरक्षणाची गरज असते तेव्हाही ते नसतात आणि आता तर राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांवर पोलिसांसमोरच हल्ला झाला. हे केवळ पोलिसांचे अपयश नाही, तर संपूर्ण प्रशासनाचे अपयश आहे. ज्या सरकारला महिला, राजकीय कार्यकर्ते आणि माजी मुख्यमंत्र्यांचे संरक्षण करता येत नाही, त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेवर भाषण देण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही.”