FCRA दुरुस्ती विधेयकाला काँग्रेसचा विरोध; सोमवारी विरोधकांच्या बैठकीत रणनीती ठरणार – मल्लिकार्जुन खरगे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

परदेशी देणगी नियमन कायद्यातील (FCRA) प्रस्तावित दुरुस्ती विधेयकाला काँग्रेस ठामपणे विरोध करणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. या विधेयकाच्या विरोधातील पुढील रणनीती सोमवारी विरोधी पक्षांच्या सभागृह नेत्यांच्या बैठकीत निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खरगे यांनी शनिवारी हल्द्वानी येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी एएनआयशी संवाद साधताना त्यांनी FCRA दुरुस्ती विधेयकावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात हे विधेयक लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे.

“FCRAशी संबंधित या निर्णयाला आम्ही विरोध करू. उद्या विरोधी पक्षांच्या सभागृह नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील रणनीतीबाबत निर्णय घेतला जाईल,” असे खरगे यांनी सांगितले.

विरोधकांचाही FCRA विधेयकाला विरोध

FCRA दुरुस्ती विधेयकाला अनेक विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला आहे. काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी काँग्रेस या विधेयकाला तीव्र विरोध करणार असल्याचे सांगितले. सरकार अशा प्रकारचे विधेयक जबरदस्तीने मंजूर करू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रस्तावित विधेयकाद्वारे Foreign Contribution (Regulation) Act, 2010 मध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचे नियमन अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी करण्याचा उद्देश असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे.