
>> ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर
महाराष्ट्रातील संत परंपरेचा विचार केला की, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत चोखा मेळा, संत सावता माळी, संत गोरा कुंभार अशा अनेक संतांची नावे सहजपणे आपल्या ओठांवर येतात. या संतांनी समाजाला भक्ती, समता आणि मानवतेचा मार्ग दाखविला. मात्र या संपूर्ण संत परंपरेला संघटित रूप देणारे, वारकरी संप्रदायाची विचार रचना करणारे, कीर्तन, अभंग आणि लोकभक्तीचा पाया घालणारे संतश्रेष्ठ भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज यांचे कार्य आजही अपेक्षित प्रमाणात समाजासमोर आलेले नाही, ही खंत अनेक अभ्यासक व्यक्त करतात.
ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीला जातात. संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यासाठी देहूला जातात. संत एकनाथ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पैठणला जातात. ही परंपरा अत्यंत गौरवास्पद आहे, परंतु याच वारकरी संप्रदायाची उभारणी करणाऱया, त्याची संघटनात्मक मांडणी करणाऱ्या आणि भक्तीला समाज जागृतीचे प्रभावी माध्यम बनविणाऱ्या संत नामदेव महाराजांच्या महासंजीवन समाधी सोहळ्याला तितक्या मोठय़ा संख्येने वारकरी पंढरपूरला उपस्थित राहत नाहीत, ही वस्तुस्थिती अंतर्मुख करणारी आहे.
वारकरी संप्रदायाच्या इतिहासाचा अभ्यास केला तर संत नामदेव महाराजांचे स्थान अत्यंत वैशिष्टय़पूर्ण असल्याचे लक्षात येते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सहवासात त्यांनी भक्तीचा मार्ग स्वीकारला. मात्र ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर त्यांनी जवळपास अर्धशतक संपूर्ण भारतभर भ्रमण करून भागवत धर्माचा प्रसार केला. महाराष्ट्राबरोबरच पंजाब, राजस्थान, गुजरात आणि उत्तर भारतात त्यांनी विठ्ठलभक्तीचा संदेश पोहोचविला. म्हणूनच त्यांच्या अनेक रचना शीख धर्माच्या पवित्र ‘गुरुग्रंथ साहिब’मध्ये स्थान मिळवतात. महाराष्ट्रातील कोणत्याही संताला न लाभलेला हा अत्यंत दुर्मीळ सन्मान आहे.
विठ्ठलभक्तीतील सर्वाधिक लोकप्रिय आरती ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा…’ हीही संत नामदेव महाराजांचीच देणगी आहे. शेकडो वर्षांपासून महाराष्ट्रातील असंख्य मंदिरे आणि वारकरी दिंडय़ांमध्ये ही आरती नित्यनेमाने गायली जाते.
संत नामदेव महाराजांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी समतेचा विचार प्रत्यक्ष आचरणातून समाजासमोर ठेवला. त्या काळातील कठोर जाती व्यवस्थेला छेद देत त्यांनी विविध समाज घटकांतील संतांना एका भक्ती परिवारात एकत्र आणले. ब्राह्मण समाजातील परिसा भागवत, संत चोखा मेळा, संत जनाबाई, संत सेना न्हावी, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत नरहरी सोनार अशा विविध जाती-समाजांतील संतांना त्यांनी समान न्याय दिला. सुमारे चोवीस संतांना एकत्र आणून त्यांनी वारकरी संप्रदायाला व्यापक लोक चळवळीचे स्वरूप दिले. सातशे वर्षांपूर्वी समतेचा हा प्रयोग घडवून आणणारे ते खऱया अर्थाने समाज सुधारक होते.
संत तुकाराम महाराजांनीही आपल्या अनेक अभंगांमधून संत नामदेव महाराजांना प्रेरणास्थान मानले आहे. यावरून वारकरी परंपरेतील त्यांचे महत्त्व अधोरेखित होते. तरीही त्यांच्या कार्याचा अभ्यास आणि प्रचार ज्या प्रमाणात व्हायला हवा होता, त्या प्रमाणात झालेला दिसत नाही.
आज समाज पुन्हा एकदा जात, धर्म, भाषा, राजकीय मतभेद आणि सामाजिक विषमता यांच्या विळख्यात अडकताना दिसतो. अशा वेळी संत नामदेव महाराजांचा समता, बंधुता, मानवता आणि सर्वसमावेशक भक्तीचा विचार अधिकच महत्त्वाचा ठरतो. त्यांच्या अभंगांमध्ये कर्मकांडापेक्षा प्रेम, सेवाभाव, श्रमाची प्रतिष्ठा आणि प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे दर्शन घडविण्याचा संदेश आहे. त्यामुळे त्यांचे विचार हे केवळ धार्मिक न राहता सामाजिक परिवर्तनाचे मार्गदर्शक ठरतात.
याच विचारांचा व्यापक प्रसार व्हावा आणि संत नामदेव महाराजांच्या महासंजीवन समाधी सोहळ्याला अधिकाधिक वारकरी सहभागी व्हावेत, या उद्देशाने श्री संत पैकाडी महाराज विश्वपुण्यधाम मंदिर, पंढरपूर यांच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून हा सोहळा भक्तिभावाने साजरा केला जात आहे. यंदा सोमवार, दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी श्री संत नामदेव महाराजांच्या 677 व्या महासंजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता ह.भ.प. रामदास (शिवराज) महाराज जाधव यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होऊन श्री संत नामदेव महाराजांच्या महासंजीवन समाधीला अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर महाद्वार येथे स्वागत सोहळा होणार असून दुपारी 1 वाजता कीर्तन, प्रवचन, भजन आणि महाआरतीने कार्यक्रमाची सांगता होईल. ज्ञानेश्वरांसाठी आळंदी, तुकारामांसाठी देहू, एकनाथांसाठी पैठण जसे महत्त्वाचे आहे, तसेच वारकरी संप्रदायाचे शिल्पकार असलेल्या संत नामदेव महाराजांसाठी पंढरपूर हे प्रत्येक वारकऱ्याच्या श्रद्धेचे केंद्र बनले पाहिजे. त्यांच्या महासंजीवन समाधी सोहळ्याला मोठय़ा संख्येने उपस्थित राहून त्यांच्या कार्याला अभिवादन करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे आवाहन श्री संत कैकाडी महाराज विश्वपुण्यधाम मंदिराचे अधिपती ह.भ.प. भारत महाराज जाधव यांनी केले आहे.































































