धावत्या लोकलमधून तोल जाऊन तरुणाचा मृत्यू, गेटवर उभे राहणे जिवावर बेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपनगरी रेल्वे मार्गावर अपघाती मृत्यूचे सत्र सुरूच असून मुंबई फिरण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा धावत्या लोकलमधून तोल जाऊन मृत्यू झाला. मोहम्मद फाजील शफीक अन्सारी असे अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण मित्रासोबत लोकलच्या गेटवर उभा होता. दरवाजा पकडलेला हात निसटला आणि तोल जाऊन फाजीलचा दुर्दैवी मृत्यू झाला. कळवा स्थानकादरम्यान ही घटना घडली.

फाजील हा भिवंडीतील बाला पंपाउंड परिसरातील रहिवासी होता. त्याने भिवंडीहून कल्याण गाठले होते. तेथून त्याने मुंबईच्या दिशेने लोकल प्रवास सुरू केला होता. तो लोकल ट्रेनच्या गेटवर मित्रासोबत उभा होता. कळवा स्थानकादरम्यान ट्रेन आली असता फाजीलने दरवाजा पकडलेला हात निसटला आणि तोल जाऊन तो खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आरपीएफच्या मदतीने फाजीलला तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले होते; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

कुटुंबाने मोठा मुलगा गमावला

फाजील हा कुटुंबातील मोठा मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक लहान भाऊ आहे. ऐन तारुण्यात मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे अन्सारी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने भिवंडीच्या बाला पंपाउंड परिसरात शोककळा पसरली आहे.