दुचाकीवरील बेफिकीरपणा जीवावर, विस्कटलेले केस बांधताना आईच्या हातातून चिमुकली निसटली; उपचारादरम्यान मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकीवरून भरधाव वेगात जात असताना एका महिलेचे वाऱ्यामुळे केस विस्कटले. केस बांधत असताना तिच्या हातातून एक वर्षाची चिमुकली निसटून ती थेट रस्त्यावर पडली. रक्तबंबाळ अवस्थेत तिला केईएम रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कृषा भावसार असे या दुर्दैवी चिमुकलीचे नाव असून तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

योगेश भावसार (३५) हे पत्नी आणि मुलगी कृषासोबत शुक्रवारी दुपारी स्कुटीवरून जात होते. त्यांची पत्नी मागे बसली होती आणि तिच्या हातात कृषा होती. प्रवासादरम्यान जोरदार वाऱ्यामुळे केस चेहऱ्यावर येत असल्याने त्याने एका हाताने मुलीला धरून दुसऱ्या हाताने केस बांधण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मुलीची पकड सुटून ती धावत्या स्कुटीवरून रस्त्यावर पडली. या घटनेनंतर पालकांनी तत्काळ कृषाला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.