वाढदिवसाच्या दिवशी प्राजक्ता माळीने घेतला मोठा निर्णय; म्हणाली, मला नाईलाजाने व्हिगन व्हावं लागलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका प्राजक्ता माळीने नुकताच तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशीच प्राजक्ताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, ती आता व्हिगन होणार असल्याची घोषणा तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे. मात्र, हा निर्णय आपण स्वखुशीने घेतलेला नसून आरोग्याशी संबंधित कारणांमुळे नाईलाजाने घ्यावा लागल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. प्राजक्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी सिद्धिविनायक आणि आई तळजाई मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिने व्हिगन होण्याचा निर्णय जाहीर केला. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं सेवन केल्यानंतर वारंवार कफाचा त्रास होत असल्याचं तिने सांगितलं आहे.

“सकाळी श्री सिद्धिविनायक आणि आई तळजाई मातेचं दर्शन घेतलं. आणि या क्षणी व्हिगन होण्याचा निर्णय घेतला. मी हा निर्णय स्वखुशीने घेतलेला नाही, तर नाईलाजाने घ्यावा लागला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे मला सारखा कफ होतोय,” असं प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तसंच, यापुढे चहा किंवा कॉफीपासूनही दूर राहावं लागू शकतं, असं तिने मजेशीर अंदाजात सांगितलं. “जर मी यापुढे चहा किंवा कॉफीला नाही म्हटलं तर प्लीज आश्चर्य व्यक्त करू नका,” असंही तिने म्हटलं आहे. प्राजक्ताने पुढे सांगितलं की, तामसिक पदार्थांनाही तिचं शरीर नकारात्मक प्रतिसाद देत आहे. त्यामुळे आता आपण ‘क्रुएल्टी फ्री’ व्यक्ती झाल्याचं तिने नमूद केलं. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत तिच्या निर्णयाचं कौतुक केलं असून, वाढदिवसाच्या शुभेच्छांचाही वर्षाव केला आहे.

प्राजक्ता माळीने ‘जुळून येती रेशीमगाठी’या मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवली. त्यानंतर तिने विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. ‘फुलवंती’या सिनेमातील तिच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. सध्या ती लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं सूत्रसंचालन करत आहे. वाढदिवसाच्या दिवशी घेतलेल्या या निर्णयामुळे प्राजक्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.