मुख्यमंत्र्यांचा यू-टर्न; कोल्हापूर हद्दवाढीचा चेंडू महायुती आमदारांच्या कोर्टात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर शहराच्या रखडलेल्या हद्दवाढीचा प्रस्ताव घेऊन या दहा मिनिटांत मंजुरी देतो, असे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या बहुचर्चित हद्दवाढीच्या निर्णयाचा चेंडू थेट येथील लोकप्रतिनिधींच्या कोर्टातच टाकत असल्याचे स्पष्टपणे जाहीर करत यू-टर्न घेतल्याचे आज दिसून आले.

 

कोल्हापूरकरांनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे आता जर आम्ही कोल्हापूरकरांचे काम केले नाही, तर आमच्यासारखे करंटे कोणीच नाही, असे सांगत कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे. त्यासाठी हद्दीबाहेरील लोकांच्या शंभर टक्के अडचणी सोडविण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. हद्दवाढीसाठी भाजप आमदार अमल महाडिक आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रदीप नरके यांनी सहकार्य करण्याचे जाहीर आवाहन उच्च वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीचा चेंडू थेट महायुती आमदार आणि खासदारांच्या कोर्टात टाकत असल्याचे जाहीर करत यातून आपले हात झटकले.

 

पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे आणि ऐतिहासिक शासकीय रुग्णालय असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) येथील विविध नूतनीकरण व आधुनिकीकरण, राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक स्थळाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह नूतनीकरण, छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुल इमारत तसेच ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह पुनर्निर्माण आदींचे लोकार्पण आणि उद्घाटन आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोल्हापुरात खंडपीठ आले असून, त्यासाठी शेंडा पार्क येथे 75 एकर जागा देत आहोत. खंडपीठामुळे या शहरामध्ये रोज 20 ते 25 हजार लोकांची ये-जा होणार आहे. त्यामुळे या शहराला अधिक सुनियोजित करावे लागणार आहे. आयटी पार्क, कन्व्हेन्शन सेंटरही येथे होत आहे. हॉकी स्टेडियमसाठी ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून निधी दिला आहे. शिवाय कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी बीसीसीआयबरोबर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे अनुपस्थित

संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह आणि खासबाग कुस्ती मैदान व्यासपीठाचे काम अपूर्ण असल्याने याचे उद्घाटन करू नये यासाठी कोल्हापूरकरांनी पैलवानांसह आंदोलन केले होते. तरीसुद्धा या विकासकामांच्या उद्घाटनासाठी महायुतीच्या नेत्यांची चढाओढ दिसून आली. मोठी जाहिरातबाजीही केली. आज झालेल्या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री शिंदे अनुपस्थित राहिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्य. अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली

कोल्हापूरचे सुपुत्र, डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे सर्वेसर्वा, बिहार, त्रिपुरा, पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी अभिवादन केले.कसबाबावडा येथील निवासस्थानी जाऊन डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील आणि कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

मंत्र्यांच्या ताफ्यामुळे कोल्हापूरकर वेठीस

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱयानिमित्त आज काही काळ कोल्हापूरकरांना वेठीस धरण्याचा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला.दहा-पंधरा मिनिटांच्या भेटीसाठी गेल्या दोन दिवसांपासून सीपीआरमध्ये येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला होता. तर, विमानतळापासून कार्यक्रमाच्या ठिकाणी हजारो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सततच्या ताफ्यांमुळे वाहनधारकांना चौकाचौकात थांबावे लागत होते. अशा कोंडीत अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाणारी शववाहिकाही अडकून पडल्याचे दिसून आले.