गुन्हे दाखल असलेल्या भ्रष्ट पालकमंत्री गोरेंना मुख्यमंत्री पाठीशी का घालतात, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा जिह्यांत 19 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या भ्रष्ट पालकमंत्री जयकुमार गोरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी का घालत आहेत, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या, जिल्हा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी केला.

सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या भ्रष्ट कारभाराचे पुरावे सादर करत प्रसारमाध्यमांसमोर वस्तुस्थिती मांडली. बार्शी येथील बैठकीचा आढावा देत त्यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे सांगितले. तसेच राम मंदिरातील चोरीप्रकरणासह अनेक विविध मुद्दय़ांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

पालकमंत्री गोरे यांच्यावर फसवणुकीसह महिलांशी संबंधित संवेदनशील प्रकरणांवरून हल्लाबोल करत, ‘काय कीर्ती राव, मिस्टर गोरे,’ असा खोचक टोला लगावत, ‘हे पालकमंत्री नसून केवळ बालकमंत्री आहेत,’ अशी टीका केली.

सुषमा अंधारे यांनी कोरोना संकटकाळात मायणी येथील इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स ऍण्ड रिसर्च सेंटरमध्ये झालेल्या वैद्यकीय गैरव्यवहारांचा पर्दाफाश केला. नियमांनुसार आणि स्थानिक प्रशासनाकडून रुग्णांसाठी मोफत औषधोपचार व वैद्यकीय स्टाफ पुरवला गेला असतानाही येथील खासगी डॉक्टरांशी संगनमत करून बोगस बिले तयार करण्याचा गोरखधंदा चालवला गेला. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा गैरवापर करत 200हून अधिक रुग्णांची बोगस बिले बनवल्याचे समोर आले आहे. यात धक्कादायक म्हणजे ज्या रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांना कागदोपत्री जिवंत दाखवून त्यांच्या नावे खोटे उपचार दाखवून लाखो रुपये लाटण्यात आले. या महाघोटाळ्याचा सविस्तर फेरफार पुराव्यांसहित उघड करताना अंधारे यांनी बिरोबा तात्या खर्जे यांच्यासह जवळपास 35 हून अधिक मृतांची यादीच सादर केली.

गैरव्यवहाराचे एक उदाहरण देताना त्या म्हणाल्या, बिरोबा खर्जे या रुग्णाचा मृत्यू 29 जून 2021 रोजी झाला होता. त्यानंतरही त्यांना 8 जुलै 2021 पर्यंत रुग्णालयात दाखल असल्याचे दाखवून 18 जुलैला डिस्चार्ज दिल्याची खोटी नोंद करण्यात आली. मृत व्यक्तींच्या नावावर खोटय़ा सह्या करून आणि बनावट एबीजी वैद्यकीय रिपोर्ट्स फाईलला जोडून कोटय़वधी रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात वडूज पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱयाने संबंधितांशी संगनमत करून या गंभीर गुह्यातून जयकुमार गोरे यांचे नाव वगळल्याचा खळबळजनक आरोपही सुषमा अंधारे यांनी केला. याप्रकरणी आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर कडक पावले उचलण्यात आली असून, संबंधितांविरोधात समन्स बजावण्यात आल्याची माहिती
त्यांनी दिली.

वैद्यकीय घोटाळ्यासोबतच जयकुमार गोरे यांच्यावर असलेल्या इतर गुह्यांचा पाढा वाचताना सुषमा अंधारे यांनी न्यायालयाच्या कागदपत्रांचे अनेक दाखले दिले. एका चारुशीला नावाच्या महिलेला अयोग्य आणि नग्न फोटो पाठवल्याप्रकरणी गोरे यांच्यावर सुरू असलेल्या प्रकरणाचा त्यांनी विशेष उल्लेख केला. या प्रकरणात पीडित महिलेवर दबाव आणून तिच्यावर उलटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याच अनुषंगाने, एका बँक खात्यात आलेले एक कोटी रुपये कुणाचे आहेत आणि ते कुठून आले, याचे उत्तर गोरे यांनी जनतेला द्यावे, असे आव्हान अंधारे यांनी दिले. तसेच एका दलित व्यक्तीची शेतजमीन बळकावल्याप्रकरणी गोरे यांच्यावर 6 मार्च 2025 रोजी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता आणि यात त्यांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला होता, अशी माहिती अंधारे यांनी पुराव्यांसह मांडली.

दहीवडी, मिरज, ईश्वरपूर आणि सातारा शहर अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये गोरे यांच्यावर तब्बल 19 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर मोक्काची फाईल तयार होती, म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये उडी मारली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  तसेच शासकीय विश्रामगृहातील आलिशान सुट्सवर जनतेच्या करातील 10 कोटी रुपयांची उधळपट्टी आणि इतर संशयास्पद आर्थिक व्यवहारांवरही त्यांनी बोट ठेवले. या सर्व गंभीर प्रकरणांची जबाबदारी स्वीकारून गोरे यांनी तत्काळ पालकमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. यासोबतच महामंत्री विजय चौधरी यांच्याशी संबंधित कथित ‘10 टक्के’ वसुलीच्या प्रकरणाचीही सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

राजकारणावर बोलताना महसूलमंत्री बावनकुळे हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. देवेंद्र फडवणीस कधी एकदा दिल्लीत जातील आणि मी राज्याचा मुख्यमंत्री होईन, अशा अविर्भावात बावनकुळे वागत आहेत, असा टोलाही अंधारे यांनी लगावला.

पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, शरणराज केंगनाळकर, दत्ता माने, प्रवीण काकडे, महानगरप्रमुख महेश धाराशिवकर, संजय पोळ, महिला जिल्हा संघटक मंगल थोरात यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.