
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप आणि सरकारवर सडकून टीका केली आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी गोळा करण्यात आलेल्या देणग्यांची चोरी आणि आपल्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेली अमानुष कारवाई, या दोन प्रमुख मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला कोंडीत पकडले असून, ‘या घटनांना जबाबदार कोण?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ANI ने यासंदभात वृत्त दिले आहे.
अखिलेश यादव पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावे, अशी विरोधकांची मागणी होती. परंतु सरकार त्यासाठी तयार नाही. अधिवेशनाचे केवळ दोन दिवस उरले आहेत, अद्यापही सरकारकडे राम मंदिरातील निधीचा गैरव्यवहार आणि विद्यार्थी आंदोलन या दोन्ही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळ आहे.”
ते पुढे म्हणाले, “प्रभू रामाच्या चरणी अर्पण केलेली देणगी चोरीला जाणे ही काही सामान्य बाब नाही. हा कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, शेवटी याला जबाबदार कोण? तसेच विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर ज्या लाठ्या चालवल्या गेल्या त्याचेही उत्तर द्या.”




























































