रस्त्याअभावी गर्भवतीचा मृत्यू, दोन महिने उलटूनही प्रशासन उदासीन; आदिवासी समाजानेच हाती घेतला रस्ता निर्मितीचा विडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात रस्त्याअभावी गर्भवती महिलेला वेळेत उपचार मिळू न शकल्याने मृत्यू झाल्याची घटना घडून दोन महिने उलटले, तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही. अखेर प्रशासनाच्या प्रतीक्षेत न राहता आदिवासी समाजानेच रस्ता तयार करण्यासाठी पुढाकार घेतला.

गोंदोलो सामुकाच्या नेतृत्वाखाली घोडणकप्पी येथे आदिवासी बांधव एकत्र आले आणि श्रमदानातून रस्ता सुकर करण्याचे काम हाती घेतले. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला. मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने आदिवासी समाजाने एकजुटीची ताकद दाखवत स्वतःच रस्त्याचे काम सुरू केले. दुर्गम भागातील नागरिकांना आजही रस्ते, आरोग्य आणि वाहतुकीसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.