हैदराबादमध्ये हिट-अँड-रनचा थरार; चुकीच्या दिशेने आलेल्या कारची तीन दुचाकींना धडक, माजी सैनिकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

हैदराबादमधील हायदरशाकोट परिसरात चुकीच्या दिशेने भरधाव आलेल्या कारने तीन दुचाकींना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या हिट-अँड-रन अपघातात 47 वर्षीय माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी सैनिक रवींदर हे आपल्या दुचाकीवरून जात असताना चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. रवींदर यांनी भारतीय लष्करात सुभेदार म्हणून सेवा बजावली होती.

पीटीआय ने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात अन्य दोन दुचाकीस्वारही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आणि दुखापतींचे स्वरूप याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. प्राथमिक तपासानुसार, अपघाताच्या वेळी कारमध्ये चार जण होते. तीन दुचाकींना धडक दिल्यानंतर कारचेही मोठे नुकसान झाले. मात्र, अपघातानंतर कारमधील चारही जण वाहन घटनास्थळीच सोडून फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी नरसिंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. कारच्या क्रमांकाच्या आधारे तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांकडून तपास केला जात आहे. दरम्यान, पहाटेच्या वेळी चुकीच्या दिशेने भरधाव वाहन चालवून झालेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला आणि कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचा तपासही पोलीस करत आहेत.