
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन मुलींचा मृत्यू झाला असून तिघींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह सुरू असतानाच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धानोरा तालुका मुख्यालयापासून जवळपास 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई येथील कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन शाळा तथा अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात रविवारी मध्यरात्री ही दुर्दैवी घटना घडली. सुश्मिता सरोजित मंडल (वय – 14), दीपिका एतवा लकडा (वय – 12) आणि अनु गजुराम कोरेटी (वय – 8) अशी मृत मुलींची नावे आहेत, तर दीपिका बिटलूरसाय मडावी (वय – 11), समृद्धी सुरेश नैताम (वय – 14) आणि कविता राजकुमार किरंगा (लय- 12) या तिघींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




























































