
परभणी जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारादरम्यान आणि रेफरल प्रक्रियेत झालेल्या कथित हलगर्जीपणामुळे सात महिन्यांच्या गर्भवती महिला आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या आरोग्य व्यवस्थेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
१०८ रुग्णवाहिकेसाठी ७ वेळा फोन, २ तास प्रतीक्षा आणि अखेर ७ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचा झालेला दुर्दैवी मृत्यू, हे अत्यंत संतापजनक आहे. सामान्य माणसाच्या जीवाची शासकीय यंत्रणेला काहीच किंमत नाही का? ‘इन्फ्रामॅन’ म्हणून मिरवणाऱ्यांना आरोग्य व्यवस्थेची ही वेशीवर टांगली गेलेली… pic.twitter.com/9MalCdhkal
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 10, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर येथील साठेनगर, नेवाती मोहल्ला येथील शेख अमीन शेख अयुब यांची पत्नी मरजीनाबी अमीन शेख (22) ही सात महिन्यांची गर्भवती होती. रक्तदाब कमी होणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवारी सायंकाळी तिला परभणी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी तब्बल 7 वेळा फोन करण्यात आला होता. मात्र दोन तास प्रतीक्षा करावी लागली. ज्यामुळे वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने गर्भवती महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला.
रुग्णवाहिकेसाठी ताटकळत ठेवल्याने गर्भवतीसह बाळाचा दुर्दैवी अंत; डॉक्टर, रुग्णवाहिका अन् रेफरलचा खेळ
या गंभीर प्रकारावर एक्स अकाऊंटवर तीव्र संताप व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे की, “108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास प्रतीक्षा आणि अखेर 7 महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचा झालेला दुर्दैवी मृत्यू, हे अत्यंत संतापजनक आहे. सामान्य माणसाच्या जीवाची शासकीय यंत्रणेला काहीच किंमत नाही का? ‘इन्फ्रामॅन’ म्हणून मिरवणाऱ्यांना आरोग्य व्यवस्थेची ही वेशीवर टांगली गेलेली लक्तरं दिसत नाहीत का? राज्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना सरकार गाढ झोपेत आहे, हे चीड आणणारं आहे.” असा संताप व्यक्त केला आहे.


























































