
जेवल्यानंतर अनेकांना अचानक सुस्ती किंवा झोप येऊ लागते. विशेषतः दुपारच्या जेवणानंतर किंवा पोटभर जेवल्यानंतर डोळे जड होणे, काम करण्याची इच्छा कमी होणे आणि काही वेळ आराम करावासा वाटणे अशी लक्षणे अनेकांना जाणवतात. ही शरीराची सामान्य प्रतिक्रिया असू शकते; मात्र काही वेळा आहार, झोपेची कमतरता किंवा इतर कारणांमुळे ही सुस्ती अधिक वाढू शकते.
भात, ब्रेड, पास्ता आणि बटाटे यांसारख्या कर्बोदकयुक्त पदार्थांचे सेवन केल्यानंतर शरीरातील रक्तातील साखर आणि इन्सुलिनच्या पातळीत बदल होऊ शकतात. काही व्यक्तींमध्ये यामुळे जेवणानंतर सुस्ती जाणवू शकते.
एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणात जेवण केल्यास पचनासाठी शरीराला अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे पोट जड वाटणे, आळस आणि झोप येणे अशी भावना होऊ शकते.
अंडी, डाळी आणि मांस यांसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅनसारखी अमिनो अॅसिड्स असतात. शरीरातील झोप आणि विश्रांतीशी संबंधित प्रक्रियांमध्ये त्यांची भूमिका असते.
रात्री पुरेशी झोप झाली नसेल तर दिवसभर थकवा जाणवतो. अशावेळी जेवणानंतर येणारी सुस्ती अधिक तीव्र होऊ शकते. त्यामुळे दिवसा झोप येण्याचे कारण केवळ जेवण नसून रात्रीची अपुरी झोपही असू शकते.
एकाच वेळी खूप मोठे जेवण करण्याऐवजी संतुलित आणि योग्य प्रमाणात आहार घ्यावा. आहारात भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि प्रथिनांचा समावेश करावा. जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करावेत.
जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी काही मिनिटे हलके चालणे फायदेशीर ठरू शकते. दिवसभर पुरेसे पाणी प्यावे आणि रात्री नियमित व पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करावा.
मात्र जेवणानंतर अतिशय जास्त झोप येणे, सतत थकवा जाणवणे किंवा या समस्येमुळे दैनंदिन कामांवर परिणाम होणे वारंवार होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.



























































