शारीरिक सुख द्यायला दिला नकार, सुरक्षा रक्षकाने इमारतीच्या टेरेसवर गळा आवळून धरत तरुणीवर केला अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदाबादमधील एका २३ वर्षीय इंटिरिअर डिझायनिंगच्या विद्यार्थिनीवर ती राहत असलेल्या सोसायटीतील सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धरम सिंग असे त्या सुरक्षारक्षकाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर तपासादरम्यान पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या धरम सिंगवर पोलिसांनी गोळीबार केला असून यात त्याच्या पायाला गोळी लागली आहे.

८ ऑगस्ट रोजी रात्री धरम सिंग लिफ्टने इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गेला आणि तिथून पायऱ्यांनी गच्चीवर पोहोचला. मूळची कच्छ येथील रहिवासी असलेली २३ वर्षीय विद्यार्थिनी गच्चीवर फोनवर बोलत होती. सुमारे २० मिनिटांनी तिच्या फोनची बॅटरी संपल्यानंतर ती खोलीत जाण्यासाठी निघाली असता आरोपीने तिला अडवून शारीरिक सुखाची मागणी केली. तरुणीने विरोध केला असता आरोपीने तिच्या गळ्याभोवती वायर गुंडाळून गळा आवळला आणि तिच्यावर अत्याचार केला.

गळ्याभोवती वायर आवळल्यामुळे पीडित तरुणीला मदतीसाठी ओरडणेही कठीण झाले होते. सुमारे तासभर चाललेल्या या अत्याचारानंतर आरोपीने तरुणीचा फोन काढून घेतला आणि गच्चीचा दरवाजा बाहेरून बंद करून रात्री इमारतीबाहेर पसार झाला. त्यानंतर तरुणीने कशाबशा दिलेल्या हाका ऐकून शेजाऱ्यांनी गच्चीचा दरवाजा उघडून तिची सुटका केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी १० पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध मोहीम राबवली. रविवारी सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान हेबतपूर भागातून आरोपी धरम सिंगला अटक करण्यात आली.

तपासाच्या पुढील कारवाईसाठी नेले जात असताना आरोपीने पोलीस निरीक्षक आर. एस. परमार यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात वीरेंद्रसिंह नावाचे पोलीस कर्मचारी जखमी झाले. बचावात्मक कारवाई करत पोलिसांनी आरोपीच्या पायावर दोन फेऱ्या झाडल्या, ज्यातील एक गोळी त्याच्या पायाला लागली. सध्या आरोपी आणि जखमी पोलीस कर्मचारी दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीवर वेगळा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

आरोपी धरम सिंग हा मूळचा उत्तर प्रदेशातील हरडोई जिल्ह्यातील रहिवासी असून गेल्या चार वर्षांपासून अहमदाबादमध्ये राहत होता. ‘A1’ नावाच्या सुरक्षा एजन्सीने चार दिवसांपूर्वीच कोणतीही पोलीस पडताळणी न करता त्याला या गृहसंकुलात तैनात केले होते. पोलीस पडताळणीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित सुरक्षा एजन्सीवरही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.