
नायजेरियातील लागोस येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रकुल फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंच्या तलवारी अक्षरशः तळपल्या. हिंदुस्थानने चार सुवर्ण, चार रौप्य आणि नऊ कांस्य अशा एकूण 17 पदकांची लयलूट करीत पुन्हा एकदा या खेळातील आपली ताकद जगाला दाखवून दिली.
वैयक्तिक प्रकारांत हिंदुस्थानींचा दबदबा
फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, पुरुष आणि महिला गटातील सेबर, फॉइल आणि एपी या सहाही वैयक्तिक प्रकारांत हिंदुस्थानी खेळाडूंनी पदकांची कमाई केली. तलवारीचे तिन्ही प्रकार गाजवत हिंदुस्थानी खेळाडूंनी पहिल्याच दिवशी आपली ताकद दाखवून दिली.
पुरुष सेबरमध्ये हिंदुस्थानचे ‘‘क्लीन स्वीप’
पुरुषांच्या सेबर प्रकारात निखिल वाघने सुवर्णपदक जिंकत हिंदुस्थानला अव्वल स्थान मिळवून दिले. लक्ष्य बदसरने रौप्यपदक पटकावले, तर अश्विनी आर्य आणि लाइशराम मोरांबा यांनी कांस्यपदक मिळवले. विशेष म्हणजे, या प्रकारातील चारही पदके हिंदुस्थानी तलवारबाजांनीच आपल्या नावावर केली हे विशेष! पुरुषांच्या फॉइलमध्ये तेजस पाटीलने रौप्य, तर हेमाश सनासमने कांस्यपदक पटकावले. एपी प्रकारात लोकेश वेमानीने रौप्यपदक मिळवले, तर शौर्य अश्विनी आणि गॉडविन अन्बकेस यांनी कांस्यपदकावर नाव कोरले.
महिलांनीही गाजवली तलवार
महिला गटातही हिंदुस्थानी खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. फॉइल प्रकारात जॉयस अशिताने सुवर्णपदक जिंकले, तर तिची सहकारी कनागलक्ष्मीने रौप्यपदक मिळवले. महिलांच्या एपी प्रकारात प्राची लोहानने सुवर्णपदक पटकावले. निवेद्या नायर आणि अनुप्रियाने कांस्यपदक जिंकत भारताची ताकद दाखवून दिली. महिला सेबरमध्येही हिंदुस्थानच्या जेफरलिनने सुवर्णपदकावर कब्जा केला. आखारीने रौप्य, तर श्रेया गुप्ताने कांस्यपदक मिळवले.
ही तर सुरुवात आहे…
फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे महासचिव राजीव मेहता यांनी हिंदुस्थानी खेळाडूंच्या कामगिरीचे काwतुक केले. खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनती आणि समर्पणामुळे हिंदुस्थानला स्पर्धेत दमदार सुरुवात करता आली असल्याचे त्यांनी सांगितले. पदकविजेते खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचे त्यांनी अभिनंदन केले. पहिल्याच दिवशी 17 पदकांची कमाई करत हिंदुस्थानी तलवारबाजांनी स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला असून, आगामी दिवसांत पदकांची ही लयलूट आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.



























































