प्राजक्ता आणि फारुकीला विजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने व सनी निम्हण यांच्या पुढाकाराने विनायक निम्हण राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत प्राजक्ता नारायणकर आणि झैद अहमद फारुकीने विजेतेपद पटकावले.

पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या झैद अहमद फारुकीने पुण्याच्या सागर वाघमारेचा 17-12, 16-12 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून बाजी मारली. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी झैदने मुंबईच्या प्रशांत मोरेचा 15-25, 25-22 व 25-10 असा तर सागरने पुण्याच्याच अभिजित त्रिपनकरचा 25-6, 25-19 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. तिसऱया क्रमांकासाठी खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबईच्या प्रशांत मोरेने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरचा 25-10, 25-11 असा सरळ दोन सेटमध्ये प्रभाव केला.

महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्राजक्ता नारायणकरने ठाण्याच्या मधुरा देवळेवर 23-19, 17-14 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी प्राजक्ताने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला 23-21, 12-25 व 25-6 असे तर मधुराने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणला 25-7, 21-17 असे पराभूत केले होते. तिसऱया क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला तीन सेटमध्ये 24-10, 14, 25 व 25-12 अशी मात केली.

स्पर्धेतील विजेत्यांना माजी राष्ट्रीय विजेते सुहास कांबळी आणि मधुरा वाळुंज यांच्या हस्ते रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर अहमद खान, यतिन ठाकूर, सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे सचिव सुशील गुजर आणि राज्य कॅरम असोसिएशनचे सहसचिव आणि स्पर्धा समन्वयक अभिजित मोहिते उपस्थित होते.