
वयाच्या अवघ्या नऊ महिन्यांत कार अपघातात कमरेखालचा भाग निकामी झाला. व्हीलचेअरवरचं आयुष्य नशिबी आलं. मात्र, संकटांसमोर गुडघे न टेकता 17 वर्षीय सिमरन शर्माने नेमबाजीत आपली ओळख निर्माण केली. गेल्या चार वर्षांत तिने राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत मोठी स्वप्ने पाहिली; पण आता तिच्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या स्वप्नापुढे निवड प्रक्रियेची भिंत उभी ठाकली आहे.
मे महिन्यात झालेल्या पॅरा आशियाड निवड चाचणीत सिमरनने 633.3 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. तरीही हिंदुस्थानी संघात तिची निवड झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, तिच्या एसएच-2 प्रकारांतील जागा कोणत्याही खेळाडूची निवड न करता रिक्त ठेवण्यात आली आहे. सिमरनने केलेली कामगिरी मागील पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाच्या 633.1 गुणांपेक्षाही सरस आहे. त्यामुळे ट्रायलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करूनही संघाबाहेर राहण्याची वेळ आल्याने निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सिमरनचे वडील बृजेश शर्मा यांनी पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या निवड धोरणाला न्यायालयात आव्हान दिले आहे. ट्रायलमध्ये नंबर वन ठरूनही संघाबाहेर ठेवण्यामागचं नेमपं कारण काय, याचं उत्तर आता संबंधित यंत्रणांना द्यावं लागणार आहे.


























































