
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगे यांना भेटायला कधी गेले नाहीत. आंदोलनाच्या वेळी एकनाथ शिंदे, उदय सामंत, चंद्रकांत बावनकुळे, शंभूराजे देसाई आणि आता प्रसाद लाड यांच्या माध्यमातून फक्त फसवी आश्वासन देऊन मराठा समाजाची फसवणूक करण्याचे काम केले जात आहे. जो पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता तयार होत नाही तो पर्यंत मराठा समाजाची फसवणूक केली जाणार असल्याचा आरोप शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे पत्रकारांशी बोलताना केला.
पुढे आमदार भास्कर जाधव म्हणाले की, मी सभागृहातही हेच सांगितले होते आणि आजही तेच सांगतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व समाजाच्या आंदोलकांना भेटले पण मनोज जरांगे यांना कधीच भेटले नाहीत.त्यांचे चेलेचपाटे सांगतात मराठा आरक्षण आम्ही आणलं. अरे २०१३ साली मराठा आरक्षण आले तेव्हा सत्तेत कोण होतं? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित करताना फडणवीस यांच्या कॅबिनेट मंत्र्यांनीच मराठा आरक्षणावर केलेल्या भाषणाची आठवण करून दिली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाकडे ज्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते त्यांनी कधी लक्ष दिले नाही. हा मार्ग पुर्ण व्हावा म्हणून कुणी प्रयत्न किंवा उपाययोजना केल्या नाहीत अशी खंत आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केल्या नाहीत. आज राज्यात कुणाचेही कुणावर लक्ष नाही. नवीन ठेके आणायचे.त्याचा ॲडव्हान्स घेऊन कमिशन काढायचे. आज रस्ते,पाणीयोजना,रूग्णालयातील औषधे आणि पोषण आहाराच्या योजनांना भ्रष्टाचाराची कीड लागली असल्याचा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.


























































