दोन्ही मुलांना दुधातून विष देऊन आईने संपवलं जीवन, पतीच्या अत्याचारांमुळे घेतला धक्कादायक निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मेहूवाला गावात एका अंगणवाडी महिला कर्मचाऱ्याने आपल्या दोन चिमुकल्यांना दुधातून विष देऊन त्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

घरातील पाण्याच्या टाकीत तिघांचेही मृतदेह आढळून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी या महिलेने रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तिने पतीकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख केला आहे. सुदेश असे मृत महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुदेश हिने गुरुवारी रात्री आपल्या दोन्ही मुलांना दुधात विष मिसळून पाजले. मुले बेशुद्ध झाल्यानंतर तिने त्यांना घरातील पाण्याच्या टाकीत फेकून दिले. त्यानंतर तिने स्वत:ही विष प्राशन करून त्याच टाकीत उडी मारून आत्महत्या केली.

पतीच्या त्रासाला कंटाळून उचलले पाऊल

मृत महिलेचा भाऊ प्रवीण याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पटी संदीप माछरा याला अमली पदार्थांचे व्यसन (नशा) असून तो सुदेशचा मानसिक व शारीरिक छळ करत होता. या रोजच्या जाचाला आणि मानसिक त्रासाला कंटाळूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप भावाने केला आहे.

भावाच्या तक्रारीवरून आणि समोर आलेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपी पती संदीप माछरा याच्याविरोधात ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) च्या कलम १०३(१) (हत्या) आणि १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.