Nanded News दोन दिवसापूर्वी झालेल्या दोन्ही खुनाचा उलगडा, सहा आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे आणि बाफना रोड येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या खुनाच्या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी दिली.

दोन दिवसापूर्वी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धनेगाव येथे इंदरजितसिंघ बावरी हा मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी धनेगाव येथे आला असता जुन्या वादाचा व फायनान्सच्या कामाचा वाद उकरुन काही आरोपींनी त्याची धारदार शस्त्राच्या साहाय्याने हत्या केली. या प्रकरणी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देवून वेगवेगळ्या टीम तयार केल्या होत्या. त्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत इंदरजितसिंघ बावरी व त्याचे नातेवाईक संत गाडगेबाबा सोसायटी जुना कौठा येथे फायनान्समध्ये काम करतात. त्यांनी आठ दिवसापूर्वी हिंगोली गेट येथून हप्ते थकीत असलेली बजाज पल्सर गाडी फायनान्सच्या सांगण्यावरुन उचलून आणली होती. त्याचा राग मनात धरुन आरोपी हे बावरी यांच्या मागावर होते. सीसीटीव्ही फुटेज, उपलब्ध असलेले पुरावे तसेच सायबर सेलची मदत घेवून पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन, पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या टिमने आरोपींचा शोध घेतला. यातील आरोपी दिलीप डाकोरे कृष्णा बारोळे , रणजित उर्फ रंज्या सूर्यवंशी , ज्योती जगदीश बिगाणीया व एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशा पाच जणांना आज अटक करण्यात आल्याचे डॉ.निलाभ रोहन यांनी सांगितले.

दुसर्‍या घटनेत इतवारा हद्दीत संगमकार बाजारच्या एका दुकानासमोर एक खुन झाला होता. त्याची ओळख पटली असून, भंगाराच्या वादातून हा खून करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. उपलब्ध पुरावे, तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या मयताची ओळख पटली असून त्याचे नाव मंगल गवळी रा.लोंढेसांगवी ता.लोहा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी यादृष्टीने इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर आज आरोपी सुजल उर्फ सुजित सुनिल पोटभरे या भंगार विक्रेत्यास श्रावस्तीनगर भागातून ताब्यात घेण्यात आले. भंगाराच्या वादातून हा खून करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.