साईच्या जागी देवदत्त संघात खेळणार का? टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी सांगितली भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साई सुदर्शन दुखापतीमुळे श्रीलंकेतील मालिकेत खेळणार नाही; पण साईच्या जागी कोणाला संधी मिळणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. देवदत्त पडिक्कलने सराव सामन्यात दमदार शतक झळकवले होते. त्यामुळे त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळेल असे वाटत आहे. पण याबाबत आता भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशु कोटक यांनी देवदत्तचे काैतुक केले आहे.

श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यात नाबाद 142 धावा पडिक्कलने केल्या होत्या. पडिक्कलने आपल्या खेळीत 18 चौकार मारले आणि विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या या खेळीमुळे कसोटी संघातील तिसऱया क्रमांकाच्या जागेबद्दलची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे असे म्हटले जात आहे.

कोटक नेमकं काय म्हणाले

बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत कोटक म्हणाले, ‘मला वाटते की, देवदत्त खूप चांगला खेळला. माझ्या मते देवदत्तची खेळी खरोखरच चांगली होती. पण पहिल्या कसोटीत तिसऱया स्थानावर नेमका कोण खेळणार हे अद्याप ठरलेले नाही. काही दिवसांतच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.’  सराव सामन्याच्या तिसऱया दिवसाच्या शेवटच्या सत्रात टीम इंडियाने चार विकेट्स गमावून 207 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. 15 ऑगस्टला गॉल येथे पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

नेट प्रॅक्टिसपेक्षा सराव सामना उपयुक्त ठरला

कोटक म्हणाले की, ‘चार दिवस नेटमध्ये सराव करण्यापेक्षा सराव सामन्यात खेळल्याने संघाला अधिक फायदा झाला. गोलंदाजांनी चांगल्या तीव्रतेने गोलंदाजी केली आणि सर्व खेळाडूंना पुरेसा सामन्याचा सराव मिळाला. हे खूप उपयुक्त होते, कारण आणखी चार दिवस नेटमध्ये सराव करणे हे सराव सामना खेळण्याइतके उपयुक्त नाही. गोलंदाजांनी चांगल्या तीव्रतेने गोलंदाजी केली. आम्ही सर्वांना संधी दिली आणि गोलंदाजांनाही फलंदाजीची संधी मिळाली.’

गोलंदाजांनाही पुरेसा सराव मिळाला

कोटक यांच्या मते, पाच षटके गोलंदाजी करणाऱया आकिब नबीला वगळता, इतर गोलंदाजांनी सामन्यात सुमारे 18 ते 20 षटके गोलंदाजी केली. त्याचबरोबर नबी आणि प्रसिध कृष्णा यांना वगळता इतर सर्व गोलंदाजांना फलंदाजीची संधीही मिळाली. त्यांनी सपाट खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांच्या प्रयत्नांची प्रशंसाही केली. खालच्या फळीतील मोहम्मद सिराज आणि गुरनूर ब्रार यांनी मारलेल्या षटकारांचाही त्यांनी सकारात्मक बाब म्हणून उल्लेख केला.